राजुरा : धोपटाळा कॉलनी येथे घडलेल्या महिला खून प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत उलगडा करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व राजुरा पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. या प्रकरणातील आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी रणधीर राजूकुंभारे (रा. महाकाली कॉलनी, चंद्रपूर) यांनी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या पत्नी शीतल कुंभारे या धोपटाळा येथील माहेरी असताना त्यांचा खून झाल्याची माहिती त्यांना मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर शीतल कुंभारे या घराच्या मागील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांची निर्घृण हत्या केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व राजुरा पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा माग काढला.
तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचेरियाल जिल्ह्यातील रेपनपल्ली येथे धाड टाकून राजेश व्यंकटी अट्टेटेला (वय ३५) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला राजुरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या धडाकेबाज कारवाईसाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे तसेच राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, राजुरा पोलीस व सायबर सेलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून जिल्ह्यातील पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.




