Home Breaking News महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने झरीत रात्रीच्या अंधारात रेतीची लुट! ७ दिवसांत पर्दाफाश करा,...

महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने झरीत रात्रीच्या अंधारात रेतीची लुट! ७ दिवसांत पर्दाफाश करा, अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने तीव्र आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

वणी / झरी जामणी :-झरी तालुक्यातील मांगली, खातेरा, दुर्भा आणि कवटा येथील रेती घाटांवरून नियमबाह्य व बेकायदेशीररीत्या रात्रीच्या अंधारात लाखो रुपयांची रेती चोरी सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कंत्राटदार आणि स्थानिक महसूल प्रशासनाच्या संगनमताने हा संपूर्ण काळाबाजार सुरू असून, या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. “येत्या ७ दिवसांत या रेती चोरीचा पर्दाफाश करून कारवाई न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ने तीव्र व खळबळजनक आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी दिला आहे.
यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार, झरी तालुक्यातील नदीपात्रातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेती तस्कर मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले आहेत. केवळ ३,२०० ब्रास रेतीची अधिकृत मर्यादा असताना, कंत्राटदारांनी स्थानिक महसूल प्रशासनाला हाताशी धरून हजारो ब्रास रेतीचा अवैध उपसा केला आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. प्रशासकीय नियमांची ऐशीतैशी करत पोकलॅंड मशीन आणि बोटींच्या साहाय्याने हा अवैध उपसा राजरोसपणे सुरू आहे.
🙏 प्रशासन मुंग गिळून गप्प!🙏
निवेदनातून स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अत्यंत तीव्र शब्दांत प्रहार करण्यात आला आहे. कोणतीही ऑनलाईन रॉयल्टी न फाडता रेती तस्करांचा हा गोरखधंदा सुरू असताना, स्थानिक महसूल प्रशासन मात्र ‘मुंग गिळून गप्प’ आहे. कुंभकर्णी झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळेच तस्कर मुजोर झाले असून त्यांचे धाडस कमालीचे वाढले आहे, असे विदारक चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.
🙏 मनसेच्या प्रमुख मागण्या 🙏
👉 अवैध उपसा करणाऱ्या रेती घाटांचा लिलाव त्वरित रद्द करण्यात यावा.👉  संबंधित दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत (Blacklist) टाकावे.👉 नियमबाह्य उपसा करणारी यंत्रसामुग्री, पोकलॅंड मशीन आणि बोटी जप्त कराव्यात.👉  बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी. स्थानिक प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या या रेती चोरीचा ७ दिवसांच्या आत पर्दाफाश करावा, अन्यथा मनसेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

🙏 जय विदर्भ🙏