Home Breaking News शेतकऱ्यांना डिझेल न मिळाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा; प्रशासनाला २ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

शेतकऱ्यांना डिझेल न मिळाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा; प्रशासनाला २ दिवसांचा ‘अल्टिमेटम’

वणी :-सध्या शेतीचा हंगाम तोंडावर असून शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करत आहेत. अशा ऐन गर्दीच्या वेळी बाजारात सत्ताधार्यांनी डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने इंधनाचे दर वाढवण्यासाठीच हा कट रचला गेला असून, हा प्रकार मनसे कदापि खपवून घेणार नाही, असा संतप्त इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांना विनाव्यत्यय डिझेल पुरवठा सुरू न झाल्यास प्रशासन आणि पेट्रोल पंपांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ‘अल्टिमेटम’ मनसेतर्फे उपविभागीय अधिकारी (S.D.O.) यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
वणी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याचा काळ हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरने मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची मोठी आवश्यकता असते. मात्र, बाजारात सत्ताधार्यांनी डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण केल्यामुळे शेती हंगामाच्या कामाला मोठी झळ पोहोचत आहे. या कृत्रिम टंचाईचा फटका सामान्य जनतेसह बळीराजाला मोठ्या प्रमाणात बसत आहे.
शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. “शेतकऱ्यांना शेतीकामासाठी जेवढे डिझेल आवश्यक आहे, तेवढे डिझेल कोणत्याही अडथळ्याविना देण्याचे कडक आदेश तात्काळ सर्व पेट्रोल पंप मालकांना देण्यात यावेत,” अशी मागणी गोहोकार यांनी केली आहे.
“डिझेल अभावी जर एकाही शेतकऱ्याचे काम थांबले, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही. येत्या २ दिवसांत इंधनाचा पुरवठा सुरळीत न झाल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि पेट्रोल पंप चालकांची असेल.”👉 फाल्गुन गोहोकार (तालुका अध्यक्ष वणी )
प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचे इशारे
शेतकऱ्यांच्या या संवेदनशील प्रश्नावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून तात्काळ तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी मनसेने केली आहे. या आंदोलनाची पूर्वकल्पना म्हणून निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी (यवतमाळ), उपविभागीय पोलीस अधिकारी (वणी), तहसीलदार (वणी) आणि ठाणेदार (पोलीस स्टेशन, वणी) यांना पाठवण्यात आल्या असून, मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवेदन देते वेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, राकेश वैद्य, विनोद कुचनकर, धीरज पिदुरकर, वैभव पुराणकर, प्रतीक बुरडकर, मंगेश येटे, आशिष ठावरी, भोला चिकनकर, प्रवीण मांडवकर, प्रदीप बदखल, चेतन काळे, गोवर्धन पिदुरकर, मनोज उरकुडे, देवा साखरकर, सुरज काकडे, धीरज बगवा, कैलास धांडे, सुरज लोंढे, यशवंत ढोके, बबलू चोपणे, संदीप अवगान, गोविंदराव थेरे, अजय तुराणकर यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक तसेच शेतकरी उपस्थित होते.

🙏 जय विदर्भ 🙏