प्रभाग क्रमांक ५, दत्त मंदिर वार्डातील महिला शौचालयाची दुरावस्था; नगरसेविका सौ. रोशनी संदीप भडके यांची पाहणी — नागरिकांकडून विशेष आभार
वरोरा : – अभिषेक किशोरराव भागडे
शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या दत्त मंदिर वार्डातील महिला शौचालयाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली असून यामुळे स्थानिक महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अस्वच्छता, पाणीपुरवठ्याचा अभाव, तुटलेली दारे व अपुरी देखभाल यामुळे हे शौचालय वापरण्यायोग्य नसल्याची तक्रार वारंवार नागरिकांकडून करण्यात येत होती.
या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ. रोशनी संदीप भडके यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने दुरुस्ती व स्वच्छतेचे काम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. शौचालय परिसराची स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, तुटलेल्या सुविधांची दुरुस्ती तसेच नियमित देखभाल याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी वार्डातील महिलांनी आपल्या अडचणी थेट नगरसेविकांसमोर मांडल्या. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लागेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली. नगरसेविका सौ. भडके यांनीही “महिलांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. शौचालय दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करून ते सुस्थितीत उपलब्ध करून दिले जाईल,” अशी ग्वाही दिली.
या तातडीच्या पाहणीबद्दल व सकारात्मक प्रतिसादाबद्दल वार्डातील नागरिकांनी नगरसेविका सौ. रोशनी संदीप भडके यांचे विशेष आभार मानले असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
🙏🏻जय विदर्भ 🙏🏻
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा. ☎️ 9673574711 ☎️8329889732




