Home Breaking News Alandi : देवस्थानच्या मदतीने पालखी मार्गावर वारी साक्षरतेची

Alandi : देवस्थानच्या मदतीने पालखी मार्गावर वारी साक्षरतेची

 

पुणे, 22 जून :- पंधरा वर्षे आणि त्यापुढील असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी आषाढी वारीत नव भारत साक्षरता या केंद्र पुरस्कृत उल्हास उपक्रमाचा प्रसार आणि प्रचार आळंदी देवस्थानच्या मदतीने पालखी मार्गावर वारी साक्षरतेची या नावाने केला जाणार आहे. या अभियानासाठी राज्य शासनामार्फत नेमण्यात आलेल्या व्हॅन, शिक्षक, स्वयंसेवक यांच्यामार्फत पथनाट्य, बॅनर, घोषवाक्याचा प्रचार आणि प्रसार केला जाणार आहे. सोबत सासवड आणि लोणंद या दोन दिवसांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी सोहळ्यातील असाक्षरांची नोंदणी शाळांच्या मदतीने केली जाणार आहे.

याबाबतचा पत्रव्यवहार नंदकुमार बेडसे यांनी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, राजाभाऊ चोपदार यांच्याशी केला आहे. याचप्रमाणे या नवभारत साक्षरता अभियानाबाबतची चर्चा बैठक पाच जूनला आळंदीत झाली होती. त्यानुसार केंद्र सरकार पुरस्कृत उल्हास नव भारत अभियान सन २०२२ ते २०२७ या कालावधीत पंधरा वर्षे आणि त्यापुढील असाक्षर असणाऱ्या व्यक्तींना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनामार्फत राज्यात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने माऊलींच्या पालखी सोहळ्यात त्याचा प्रचार आणि प्रसार आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर केला जाणार आहे.

संपूर्ण पालखी मार्गावर सोहळ्या दरम्यान साक्षरता अभियानात सहभागी असलेल्या सर्व वारकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी आळंदी देवस्थान आणि मानकरी यांचे सहकार्य राज्य शासनाने घेतले आहे. सोहळ्यातील सर्व दिंडी प्रमुखांना याबाबत सविस्तर सूचना देण्याची जबाबदारी आता आळंदी देवस्थानवर टाकण्यात आलेली आहे. पालखी सोहळा आणि वारी संपल्यानंतर वारकरी जेव्हा आपल्या मूळ गावी जातील तेव्हा तेथील जवळच्या शाळेशी संपर्क साधून ऑनलाइन नोंदणी असाक्षर लोकांची करावयाची आहे. संबंधित शाळा असाक्षर स्वयंसेवकाबरोबर जोडणी करणार आहेत. त्यानंतर असाक्षरांना शिकवणे सुरू केले जाईल.