29 November 2026News Website

खांबाड्यात घुमणार ‘कबड्डी-कबड्डी’चा नाद; ४५ व्या भव्य विभागीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन.

खांबाडा :- मातीतील रांगड्या आणि पारंपरिक कबड्डी खेळाला नवसंजीवनी देणाऱ्या ‘मा. भवानी क्रीडा मंडळ, खांबाडा’ यांच्या वतीने आयोजित ४५ व्या पुरुष विभागीय भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखदार सोहळ्यात पार पडला.”कबड्डीसारख्या अस्सल देशी खेळाला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण भागातील लपलेल्या गुणवंतांना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या मंडळाचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार मान्यवरांनी याप्रसंगी काढले.



या स्पर्धेच्या खेळाप्रसंगी उपस्थित राहून भद्रावती- वरोरा निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय करनदादा देवतळे यांनी व मान्यवरांनी मैदानात उतरलेल्या सर्व खेळाडूंना आगामी सामन्यांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या भव्य उद्घाटन सोहळ्याला मंडळाचे अध्यक्ष प्रफुलजी थुटे, डॉ. राऊत साहेब, विजयराव मोकाशी, मंडळाचे संस्थापक प्रकाशबाबू कडूकर, सचिव पवनभाऊ निवटे, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवरावजी चापले यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सामन्यांचा थरार अनुभवण्यासाठी खांबाडा व परिसरातील क्रीडाप्रेमी नागरिक आणि खेळाडूंनी मैदानावर मोठी गर्दी केली होती. या ४५ व्या विभागीय स्पर्धेत कोणता संघ बाजी मारणार, याकडे आता संपूर्ण विभागाचे लक्ष लागले आहे.

अभिषेक किशोर भागडे