नागरी, ता. वरोरा :- गोरगरीब आणि गरजू रुग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या सामाजिक बांधिलकीतून आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील निवडक रुग्णांना पुढील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.
या शिबिरात एकूण १२४ रुग्णांची नेत्र तपासणी व नोंदणी करण्यात आली. त्यामधून ४८ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झाली असून, त्यांच्यावर शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील रुग्ण नागपूरकडे रवाना होताना त्यांच्या चेहऱ्यावर उपचारांचा दिलासा आणि दृष्टी पुन्हा मिळण्याची आशा पाहायला मिळाली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने मोलाचे सहकार्य केले. समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे, आर्थिक अडचणींमुळे कोणाचेही उपचार थांबू नयेत आणि नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते सचिनभाऊ धात्रक यांनी स्पष्ट केले.
गरजू रुग्णांना आधार देणे आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्याच्या कामात सहभागी होता येणे, हेच खरे समाधान व मोठे सामाजिक योगदान आहे. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद हीच पुढील कार्याची खरी प्रेरणा असल्याचे सचिनभाऊ धात्रक यांनी नमूद केले.





