” माजी खासदार डॉ. अशोक नेते, ‘साथ फाऊंडेशन’चे अध्यक्ष रोहित बोम्मावार व किशोर वाकूडकर यांच्या संवेदनशील पुढाकाराने करपण्याच्या मार्गावर असलेले धान पीक वाचले; बळीराजा सुखावला “
सावली :- सावली तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आणि घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेल्या मौजा जणकापूर (रिठ) येथील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गोसीखुर्द धरणाच्या काठावर शेती असूनही तांत्रिक अडचणींमुळे गेल्या १० ते १५ वर्षांपासून सिंचनाच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या तब्बल १०० एकर शेतीला अखेर हक्काचे पाणी मिळाले आहे. माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, ‘साथ फाऊंडेशन’चे अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहितभाऊ बोम्मावार आणि भाजप तालुकाध्यक्ष किशोर वाकूडकर यांच्या विशेष पुढाकारामुळे ऐन संकटात सापडलेले शेतकऱ्यांचे धान पीक वाचले असून, संपूर्ण परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
पाण्याविना कोमेजत होती १०० एकर शेती :- जणकापूर येथील शेतकऱ्यांची शेती गोसीखुर्द धरणाला लागूनच आहे; परंतु धरण खालच्या भागात आणि शेती उंचावरच्या भागात असल्याने गेल्या १५ वर्षांपासून या भागातील १०० एकर शेतीला धरणाचे पाणी मिळत नव्हते. ५० फूट खोल आणि जमिनीवर कालवा असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी डिझेल इंजिन लावून पाणी उपसावे लागत असे. दोन महिने सतत इंजिन चालवण्याचा अवाढव्य खर्च सामान्य शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नव्हता. त्यातच यावर्षी खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने धान पीक करपण्याच्या मार्गावर आले होते व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते.
२०१४ पासूनचा लढा आणि लोकआग्रहाखातर नेत्यांची धाव :- या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी ‘साथ फाऊंडेशन’चे संचालक श्री. खुशाल लोडे यांनी सन २०१४ पासून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आमदार व अधिकाऱ्यांच्या चकरा मारूनही स्थानिक पातळीवर या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने ही समस्या कायम होती. अखेर जणकापूर येथील शेतकऱ्यांनी ग्रामस्थांची बैठक बोलावून श्री. खुशाल लोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते, सावली तालुका भाजपचे युवा नेते तथा ‘साथ फाऊंडेशन’चे अध्यक्ष रोहितभाऊ बोम्मावार आणि भाजप तालुकाध्यक्ष किशोर वाकूडकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली.
‘एक हात मदतीचा’ उपक्रमातून साकारले जलस्वप्न :- शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आणि पिकांचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेऊन या तिन्ही नेत्यांनी तातडीने हा प्रश्न गांभीर्याने घेतला. खर्चाचा आकडा मोठा असला तरी “शेती आणि शेतकरी जगला पाहिजे” ही संवेदनशील भूमिका घेत या नेत्यांनी ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत गत २८ सप्टेंबर २०२६ रोजी मोटारपंप, इलेक्ट्रिक केबल व इतर आवश्यक साहित्य खरेदीसाठी मोलाची आर्थिक मदत केली. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून एकत्र करून उभी केली आणि पाणी उपसा योजना कार्यान्वित केली.
शेतकऱ्यांकडून मान्यवरांचे कृतज्ञतापूर्वक आभार! सध्या या सामूहिक प्रयत्नांमुळे जणकापूर येथील संपूर्ण १०० एकर शेती मोटारपंपाच्या सहाय्याने ओलिताखाली आली असून, शेतकऱ्यांचे धान पीक पूर्णपणे तरारले आहे. अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. या समाजहिताच्या व अभिनव कार्याबद्दल जणकापूर व परिसरातील शेतकऱ्यांनी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, ‘साथ फाऊंडेशन’चे अध्यक्ष रोहितभाऊ बोम्मावार, भाजप सावली तालुकाध्यक्ष किशोर वाकूडकर, तसेच विशेष सहकार्य करणारे दिवाकरभाऊ गेडाम आणि ‘साथ फाऊंडेशन’चे संचालक खुशाल लोडे यांचे मनापासून कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत.





