9 November 2026News Website

वरोऱ्यात रोटरॅक्ट क्लबतर्फे ‘स्माइल ऑन व्हील्स’ उपक्रम उत्साहात संपन्न; अनोख्या अंदाजात दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

वरोरा :- दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि तो सर्वांसोबत वाटण्याचा सोहळा. याच उद्देशाला समोर ठेवून रोटरॅक्ट क्लब ऑफ वरोरातर्फे ‘Creating Lasting Impact’ या संकल्पनेअंतर्गत ‘प्रोजेक्ट स्माइल ऑन व्हील्स’ हा अत्यंत स्तुत्य आणि अनोखा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आला. या उपक्रमामुळे वरोरेकरांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंददायी ठरली.



खाऊने सजलेली कार आणि शहरात उत्साहाचे वातावरण दिवाळीनिमित्त एक कार आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. विशेष म्हणजे या कारवर लहान मुलांना आवडणारे चिप्स, टकाटक, चॉकलेट्स व विविध प्रकारचा खाऊ सजवण्यात आला होता. ही फिरती कार वरोरा शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून नागरिकांमध्ये दाखल झाली.

आनंदवन चौक ते आनंदवन कॉलेज, नागपूर रोड ते चंद्रपूर रोड, रत्नमाला चौक ते जाजू हॉस्पिटल, जाजू हॉस्पिटल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आंबेडकर चौक ते डोंगरवार चौक आणि डोंगरवार चौक ते वणी नाका असा या कारचा मार्ग होता. या संपूर्ण मार्गावर लहान मुलांना व नागरिकांना मोफत खाऊचे वाटप करत दिवाळीच्या गोड शुभेच्छा देण्यात आल्या.



नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद छोट्याशा भेटीतून आनंद वाटणे, नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आणि दिवाळीचा आनंद प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. वरोरा शहरात प्रथमच राबविण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमास नागरिकांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान मुलांचा आनंद तर पाहण्यासारखा होता.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ वरोराचे अध्यक्ष रोटरॅक्टर विक्की आगलावे, रोटरॅक्टर नितीन भोजेकर, आदित्य ठाकरे तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

अभिषेक किशोर भागडे