पांढरकवडा (प्रतिनिधी) :– पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व सुविधांची माहिती पोहोचवण्यासाठी विविध सेवाभावी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच अभियानांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पांढरकवडा यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेष LED चित्ररथाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या LED चित्ररथाच्या माध्यमातून दुर्गम व ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना, नवनवीन उपक्रम आणि उपलब्ध सुविधांची सविस्तर माहिती गावागावात थेट पोहोचवली जाणार आहे. तसेच यादरम्यान नागरिकांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य ते शासकीय मार्गदर्शन व उपाययोजना उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपविभागीय दंडाधिकारी श्री. रेवय्या डोंगरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला गती देणे हाच ‘सेवा संकल्प अभियाना’चा मुख्य ध्यास असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.




