वरोरा :-आनंदवन येथे ‘Youth Socialgram Foundation’चा ५ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आनंदवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच उपस्थितांना व गरजूंना फळवाटप करण्यात आले. “पर्यावरण संवर्धन हीच काळाची गरज” हा संदेश देत या उपक्रमातून संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी आगळ्यावेगळ्या पद्धतीने जपली.
कार्यक्रमाला महारोगी सेवा समितीचे विश्वस्त कडू गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी वृक्षारोपणाचे आणि संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, भावी पिढीच्या सुरक्षेसाठी पर्यावरण संरक्षणात युवकांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.या सोहळ्यासाठी राज्यभरातून संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातून ऋषी शेलार, गडचिरोली जिल्ह्यातून रश्मी कामठे, सोलापूर जिल्ह्यातून योगेश करचे, तर चंद्रपूर जिल्ह्यातून रुपेश कुत्तरमारे, मयूर हनवते, क्षितिज केराम, सूर्यकांत जांभुळे, वनश्री किन्हेकार आणि राकेश शिरसागर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्थापनेपासूनच Youth Socialgram Foundation च्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरणीय आणि युवक-केंद्रित विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या गत पाच वर्षांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थितांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. वृक्षारोपण आणि फळवाटपाच्या या सकारात्मक उपक्रमाने आनंदवन परिसरातील नागरिकांचीही विशेष पसंती मिळवली.




