Home जिल्हा NSS विद्यार्थ्यांकडून प्रार्थना मंदिर परिसरात श्रमदान

NSS विद्यार्थ्यांकडून प्रार्थना मंदिर परिसरात श्रमदान

वरोरा, दि. 8 sept. : आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिर परिसरात स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविला. या उपक्रमात महाविद्यालयातील सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करणदादा देवतळे यांच्या माध्यमातून NSS विद्यार्थ्यांना सदर परिसरात श्रमदान करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी सकाळी सुमारे ८.३० ते १०.३० या वेळेत मंदिरासमोरील पटांगण व परिसरात श्रमदान केले.

या श्रमदानादरम्यान विद्यार्थ्यांनी परिसरातील वाढलेले गवत, झाडाझुडपे, कचरा तसेच इतर अस्वच्छता दूर केली. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत परिसराची स्वच्छता करून प्रार्थना मंदिराचा परिसर अधिक स्वच्छ व सुस्थितीत करण्यासाठी योगदान दिले. सामूहिक श्रमदानातून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले.

या उपक्रमावेळी आमदार करणदादा देवतळे यांच्या मातोश्रींची, श्वेताताई देवतळे, भाजप ज्येष्ठ नेते भगवान गायकवाड, नगरसेविका वर्षा पिसाळ, गजानन राऊत, राऊत सर, उपस्थिती .विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानाचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत त्यांनी सामाजिक कार्यात युवकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

आनंद निकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्या मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच NSS विभागाचे कार्यक्रम अधिकारी सुरेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.

NSSच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रमदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होण्यास मदत होत आहे.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्रमाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. प्रार्थना मंदिर परिसर स्वच्छ करण्यासोबतच स्वच्छता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.