वरोरा :- तालुक्यातील टेमुर्डा येथील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात कायमस्वरूपी कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असतानाच टेमुर्डा पोस्ट ऑफिसमध्ये शाखा पोस्टमास्तर (BPM) म्हणून काम करून मानधन घेतल्याचा आरोप गोपाळकृष्ण पांडुरंग आगलावे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करत चिनोरा येथील तक्रारदार चिरकुटा गोपाळराव ढेंगळे यांनी आगलावे यांच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
तक्रारीनुसार, आगलावे हे विद्यालयात कायमस्वरूपी कनिष्ठ लिपिक असताना टेमुर्डा पोस्ट ऑफिसमध्ये BPM म्हणून कार्यरत होते. याबाबत त्यांनी संबंधित विभागाची पूर्वपरवानगी घेतली होती का, असा प्रश्न तक्रारदाराने उपस्थित केला असून दोन्ही ठिकाणांहून आर्थिक लाभ घेतल्याने शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांनी टाळाटाळ केल्याने आणि डाक विभागाने तृतीय पक्षाची माहिती असल्याचे सांगून नाकारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यापूर्वी विविध स्तरांवर तक्रारी केल्या असून प्रवर डाक अधीक्षक चंद्रपूर, मुख्याध्यापकांचे पत्र व इतर शासकीय पत्रव्यवहारांचा संदर्भ तक्रारीत जोडला आहे. शाळा प्रशासन व प्रवर डाक कार्यालय, चंद्रपूरमार्फत सखोल चौकशी करून आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, कथित अतिरिक्त मानधनाची वसुली करावी आणि दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ढेंगळे यांनी केली आहे. तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, अधिकृत चौकशीतून वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच सत्य समोर येईल.