29 November 2026News Website

वरोरा येथील ६.५१ कोटींच्या टाऊन हॉल व शॉपिंग सेंटरच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार? वास्तुपूजनापूर्वीच भिंतींना तडे; भाजप शहराध्यक्ष संतोष पवार यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

वरोरा :- वरोरा नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या अंदाजे ६ कोटी ५१ लाख रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी टाऊन हॉल आणि शॉपिंग सेंटरच्या बांधकामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून कामात मोठी अनियमितता केली जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक तथा वरोरा भाजप शहराध्यक्ष श्री. संतोष सुरेश पवार यांनी केला आहे. या बांधकामाचे वास्तुपूजन होण्यापूर्वीच उभारण्यात आलेल्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे (Cracks) गेले असून, सार्वजनिक निधीचा असा अपव्यय सहन केला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.



या संदर्भात श्री. संतोष पवार यांनी आज (दि. २३ नोव्हेंबर २०२६) नगर परिषद वरोराचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा यांना लेखी निवेदन देऊन या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.

नेमके प्रकरण काय ? वरोरा शहरात सुमारे ६.५१ कोटी रुपये खर्चून टाऊन हॉल व शॉपिंग सेंटरचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, इमारतीचे वास्तुपूजन होण्यापूर्वीच नव्याने उभारलेल्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. हे तडे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न कंत्राटदाराकडून करण्यात आला, तरीही ते तडे आजही स्पष्टपणे दिसत आहेत. यामुळे संपूर्ण इमारतीच्या मजबुतीवर आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संतोष पवार यांच्या प्रमुख मागण्या :- १. स्वतंत्र तांत्रिक तपासणी: सदर बांधकामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत तातडीने स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्यात यावी. २. प्रयोगशाळा चाचणी :- बांधकामात वापरण्यात आलेल्या सिमेंट, विटा व इतर साहित्याचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि संपूर्ण कामाची तांत्रिक पडताळणी व्हावी. ३. कठोर कारवाई व काळी यादी :- तपासणीमध्ये निकृष्ट दर्जाचे काम किंवा अनियमितता आढळून आल्यास संबंधित कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकावे, तसेच कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी. ४. देयके (बिले) रोखणे :- जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत संबंधित कंत्राटदाराची कोणतीही देयके अदा करण्यात येऊ नयेत.

भाजपचा आंदोलनाचा इशारा :- “जनतेच्या पैशांचा म्हणजेच सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि बांधकामाच्या गुणवत्तेशी होणारी तडजोड कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा खणखणीत इशारा नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिला आहे.

सदर निवेदनाची प्रत वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. करणदादा संजय देवतळे यांनाही पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलावा  आता नगर परिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण वरोरावासियांचे लक्ष लागले आहे.

अभिषेक किशोर भागडे