29 November 2026News Website

वरोरा न्यायालयात दुसऱ्या दिवशीही रणसंग्राम; वकिलांच्या एल्गाराने न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प!

“उच्च न्यायालयाप्रमाणे २००६ पासून वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन तीव्र; ‘अधिवक्ता संघ, वरोरा’चा जाहीर पाठिंबा”

वरोरा :-“हम सब एक है, अभी नही तो कभी नही!” असा बुलंद नारा देत जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून, वरोरा न्यायालयाचे संपूर्ण कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. राज्यभरातील चारही प्रमुख महासंघांच्या कडक पाठिंब्यासोबतच आता ‘अधिवक्ता संघ, वरोरा’ यांनीही या लढ्यात उडी घेतल्यामुळे या आंदोलनाने अत्यंत आक्रमक रूप धारण केले आहे.



उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना लागू असलेली सुधारित वेतनश्रेणी सर्व दुय्यम न्यायालयांच्या कर्मचाऱ्यांना सन २००६ पासून थकबाकीसह लागू करावी, या एकमेव आणि न्याय्य मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी हे संपाचे हत्यार उपसले आहे.

अधिवक्ता संघ, वरोरा यांचा संपास जाहीर पाठिंबा न्यायदान प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अधिवक्ता संघ, वरोरा यांनी अधिकृत पत्र काढून न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपास आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे न्यायालयीन कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला असून, महाराष्ट्र शासनाने न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपाचा आणि त्यांच्या वेतनवाढीच्या मागण्यांचा तातडीने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी आग्रही मागणी अधिवक्ता संघाने केली आहे.

शासनाच्या दुजाभावाविरोधात तीव्र संताप न्यायदान प्रक्रियेचा कणा असलेल्या दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांकडून उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांएवढेच कष्टाचे काम करून घेतले जाते; मात्र वेतनाच्या बाबतीत शासनाकडून सातत्याने दुजाभाव केला जात आहे. “समान काम, समान वेतन” या मूलभूत तत्त्वांनाच शासन हरताळ फासत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात तीव्र संताप उसळला आहे.

पाचही संघटनांची वज्रमूठ या आंदोलनाला राज्य पातळीवरील प्रमुख चारही महासंघांसह स्थानिक अधिवक्ता संघाचे पूर्ण बळ मिळाले आहे:

  • महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट – क)
  • महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल स्टेनोग्राफर असोसिएशन
  • महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलिफ कर्मचारी महासंघ
  • महाराष्ट्र राज्य न्यायालयीन गट-ड कर्मचारी महासंघ
  • अधिवक्ता संघ, वरोरा (विशेष पाठिंबा)

“उच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनाही सन २००६ पासून सुधारित वेतनश्रेणी थकबाकीसह लागू करावी, ही आमची स्पष्ट मागणी आहे. अधिवक्ता संघ, वरोरा यांच्या पाठिंब्याने आमच्या लढ्याला अधिक बळ मिळाले असून, जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील.”  आंदोलक व संघटना पदाधिकारी

अभिषेक किशोर भागडे