Home जिल्हा अंबादेवी देवस्थानच्या सेवाव्रतींचा सन्मान; निस्वार्थ सेवेचा गौरव

अंबादेवी देवस्थानच्या सेवाव्रतींचा सन्मान; निस्वार्थ सेवेचा गौरव

वरोरा, दि. ६ सप्टेंबर २०२६ :- श्री अंबादेवी देवस्थान, खांजी, वरोरा येथे ‘सेवाव्रतींचा सत्कार सोहळा’ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. देवस्थानच्या स्थापनेपासून प्रथमच अशा स्वरूपाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.



नवरात्रोत्सव, आषाढी एकादशी तसेच देवस्थानमध्ये वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये अनेक महिला व पुरुष भाविकांनी निस्वार्थ भावनेने आणि कोणतेही मानधन न घेता निशुल्क सेवा बजावली आहे. देवस्थानच्या प्रत्येक उपक्रमात वेळ, श्रम आणि सहकार्य देणाऱ्या या सेवाव्रतींच्या योगदानाची दखल घेत त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.



यावेळी श्री. मदन ठेंगणे सर यांनी श्री अंबादेवी देवस्थानचा इतिहास व देवस्थानच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीची माहिती उपस्थितांना दिली. त्यांच्या माहितीपूर्ण मनोगतातून उपस्थितांना देवस्थानच्या इतिहासाची व परंपरेची माहिती मिळाली.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून सेवाव्रतींच्या निस्वार्थ सेवेचे कौतुक केले तसेच अशा सेवाभावी कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेल्या उपक्रमाचे अभिनंदन केले. देवस्थानच्या नवीन ट्रस्टी मंडळाने घेतलेल्या या उपक्रमाचेही मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
यावेळी सेवाव्रतींच्या वतीने एका महिला सेवाव्रतीने मनोगत व्यक्त करताना देवस्थानसाठी सेवा करण्याची संधी मिळणे ही आनंदाची व समाधानाची बाब असल्याचे सांगितले. देवस्थानच्या नवीन ट्रस्टी मंडळाचे अभिनंदन करून, सेवाव्रतींच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.



पुढील काळातही देवस्थानच्या सर्व उपक्रमांमध्ये सेवाभावी योगदान देत राहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अंबादेवी देवस्थान ट्रस्टी मंडळ, वरोरा अध्यक्ष मा. श्री. रामभाऊ बारुजी पारखी होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा मा. सौ. अर्चनाताई आशिष ठाकरे उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थितीत मा. सौ. योगिता भारत नेरकर तसेच मा. श्री. मनीष मुरलीधर जेठाणी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सौ.स्मिता सोणेकर ताई यांनी केले. प्रास्ताविक श्री. विजय पावडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अशोक पारखी यांनी केले.
निस्वार्थ भावनेने देवस्थानची सेवा करणाऱ्या सेवाव्रतींचा सन्मान करून त्यांच्या कार्याला कृतज्ञतेची दाद देणारा हा सोहळा अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी ठरला. देवस्थानच्या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सेवाव्रतींचा सन्मान करण्याची ही परंपरा यापुढेही कायम राहावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
ट्रस्टी मंडळ, श्री अंबादेवी देवस्थान (खांजी), वरोरा