वरोरा, दि. ६ सप्टेंबर: धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आता निर्णायक लढ्याची वेळ आल्याचा निर्धार व्यक्त करत “चलो वरोरा” या घोषणेसह वरोरा तालुक्यातील समस्त धनगर बांधव-भगिनींना ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालय, वरोरा येथे एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी समाजाने आजवर उपोषणे, मोर्चे, मेळावे तसेच विविध आंदोलनांच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष केला. उच्च न्यायालयाचा निकालही लागला; मात्र महाराष्ट्र सरकारकडून अद्याप ठोस अंमलबजावणी न झाल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर १८ सप्टेंबर २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या महत्त्वाच्या सुनावणीपूर्वी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, यासाठी राज्यभर दबाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.समाजाच्या मते, या लढ्याची सर्वात मोठी आशा म्हणजे सुरू असलेली न्यायालयीन लढाई असून, या प्रकरणासाठी मधु शिंदे, बघेल, पाचघरे, अॅड. दत्ता माने, सुधाकर शेलके आणि विक्र कोळेकर यांच्यासह अनेक जण अहोरात्र प्रयत्न करत आहेत. या लढ्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि अनेक दानशूर व्यक्ती आर्थिक मदत करत असल्याचेही आवाहनात नमूद करण्यात आले आहे.
समाजाच्या एकजुटीअभावी आणि दबावाच्या कमतरतेमुळे आरक्षणाचा प्रश्न रखडल्याचे मत व्यक्त करत, “मी नाही गेलो तर काय फरक पडणार?” ही मानसिकता सोडून प्रत्येकाने समाजासाठी वेळ द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.याच अनुषंगाने ७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यांमध्ये एकमुखी आणि बहुसंख्येने निवेदने सादर करण्यात येणार असून, वरोरा येथे होणाऱ्या आंदोलनात कर्मचारी, तरुण, शेतकरी, कामगार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धनगर समाजाच्या भविष्यासाठी पक्ष, संघटना, राजकारण आणि मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार या अभियानातून व्यक्त करण्यात आला असून, “जय मल्हार, धनगर एकजूट जिंदाबाद” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.




