Home जिल्हा विवेकानंद महाविद्यालयात विद्यार्थी परिचय कार्यक्रम उत्साहात.मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन.

विवेकानंद महाविद्यालयात विद्यार्थी परिचय कार्यक्रम उत्साहात.मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन.

भद्रावती :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथील अभ्यास केंद्र क्रमांक ४२२७ ए (A) येथे समंत्रक व विद्यार्थी परिचय कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नवीन विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाची शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम, शैक्षणिक प्रक्रिया, परीक्षा पद्धती आणि उपलब्ध शैक्षणिक सुविधांची माहिती व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. अभ्यासाचे नियोजन, सातत्यपूर्ण अध्ययन, परीक्षा प्रक्रिया आणि उपलब्ध शैक्षणिक संधी याबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली.



कार्यक्रमाचे मार्गदर्शन केंद्र संयोजक डॉ. यशवंत घुमे यांनी केले. विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक संधींचा लाभ घेत सातत्याने अभ्यास करून आपल्या ज्ञानात भर घालावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अभ्यास केंद्राचे माजी विद्यार्थी तथा मुख्याध्यापक वनकर आणि प्राचार्य प्रीती क्षीरसागर यांनी आपले शैक्षणिक व व्यावसायिक अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. शिक्षणासोबत कौशल्यविकास आणि सकारात्मक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सहकेंद्र संयोजक आशिष दुपारे, आभारप्रदर्शन समंत्रक प्रा. संघपाल वेले यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी, समंत्रक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.