वरोरा :- वरोरा तालुक्यातील राळेगाव परिसरात एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला असून, वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाच्या ४ बकऱ्या जागीच ठार झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र दहशत पसरली असून, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.राळेगाव येथील मेंढपाळ संजय दडमल नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांना घेऊन गेले होते. दरम्यान, दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्या कळपावर झडप घालून ४ बकऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना ठार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
💥 तातडीने बंदोबस्ताची मागणी 💥
वाघाचा वावर वाढल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात कोणतीही मोठी जीवितहानी टळावी, यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलून या वाघाचा बंदोबस्त करावा आणि त्याला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी होत आहे. शिवसेना माजी उपशहर प्रमुख मनीष दोहतरे आणि स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे ही मागणी केली आहे.
💥 नुकसानभरपाईची मागणी 💥
वाघाच्या हल्ल्यात आर्थिक नुकसान झालेले मेंढपाळ संजय दडमल यांना शासनाच्या नियमानुसार तात्काळ व योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. वनविभागाने तातडीने या प्रकरणी लक्ष घालून ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.




