Home Breaking News वरोरा बाजार समितीत मोठी खळबळ: चार संचालकांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार!

वरोरा बाजार समितीत मोठी खळबळ: चार संचालकांच्या सदस्यत्वावर टांगती तलवार!

“ग्रामपंचायतींची मुदत संपताच उपनिबंधकांच्या दणक्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ”

वरोरा :- वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठा भूकंपाचा झटका बसला आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडून आलेल्या चार संचालकांच्या पात्रतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांनी थेट कलम १५ अंतर्गत धडक नोटीस बजावल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने २१ सप्टेंबर २०२६ रोजी ही नोटीस जारी केली आहे. डॉ. श्री विजय रामचंद्र देवतळे यांनी ७ सप्टेंबर २०२६ रोजी केलेल्या विनंती अर्जाला संदर्भ देत ही कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.



  • चारगाव खुर्द येथील राजू चिकटे

  • भटाळा येथील हरीश जाधव
  • एकोना येथील गणेश चवले
  • जामखुला येथील पुरुषोत्तम पावडे

या चारही संबंधित ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारी २०२६ रोजीच संपुष्टात आली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या आधारावर बाजार समितीत ताणून धरलेल्या अधिकारांवर आता कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पपण (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम १३(२) आणि कलम १५ मधील तरतुदीनुसार, या संचालकांचे पद आता समाप्त का घोषित करू नये, असा सवाल उपस्थित केला गेला आहे.



३० सप्टेंबरची तारीख ठरवणार राजकीय भविष्य

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने या प्रकरणी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे:

“संबंधित संचालकांनी स्वतः किंवा आपल्या वकिलामार्फत कागदपत्री पुराव्यासह स्वयंसिद्ध खुलासा ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांच्या कार्यालयात उपस्थित राहून सादर करावा, असे नोटीसीत स्पष्ट करण्यात आले आहे.”

जर निर्धारित दिवशी खुलासा सादर केला नाही किंवा दिलेला खुलासा असमाधानकारक ठरल्यास, नियमानुसार थेट आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कडक इशाराही देण्यात आला आहे.



किंग मेकरची चाल काय असणार?

या धडक नोटीसीमुळे वरोरा बाजार समितीच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. ग्रामपंचायत मतदारसंघातील या चार संचालकांच्या भवितव्याची सर्व मदार आता आगामी ३० सप्टेंबरच्या सुनावणीवर येऊन ठेपली आहे. बाजार समितीच्या या राजकारणात आता पक्षातील ‘किंग मेकर’ नेमकी काय चाल खेळणार आणि सभापती पदाची सूत्रे कोणाच्या हातात जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे!