मुंबई/चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील बंगाली, उर्दू आणि तेलुगू या अल्पभाषिक माध्यमांच्या शाळा बंद करण्याच्या आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या हालचाली तीव्र होत असून, यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधःकारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर मुद्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. याकरिता वरोरा -भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार करणदादा देवतळे यांनी पुढाकार घेत याच पार्श्वभूमीवर, आज मुंबई येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मा. प्रधान सचिवांची भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील अल्पभाषिक शाळांबाबत एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद करण्यात येऊ नयेत आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले समायोजन त्वरित स्थगित करावे, अशी आक्रमक व स्पष्ट मागणी या वेळी करण्यात आली.
अल्पभाषिक विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षणाची सोयी-सुविधा कायम मिळायलाच हवी आणि त्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या अशा धोरणांना आळा घालून प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही विनंती करण्यात आली आहे. अल्पभाषिक शाळांच्या अस्तित्वाचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास तीव्र संताप व्यक्त होत आहे.




