वणी :- नांदेपेरा ते शेलू या मुख्य मार्गाची झालेली अत्यंत दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या चालढकल कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला आहे. रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका पाहता, प्रशासनाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने वणी येथील जिल्हा परिषद उपकार्यकारी अभियंत्यांना अंतिम निवेदन देण्यात आले. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आगामी ३ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला आहे.
🙏 रस्त्याची चाळण आणि नागरिकांचे हाल🙏
नांदेपेरा ते शेलू रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या मार्गाची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. या मार्गावरून शेतकरी, शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रसिद्ध शेलू येथील मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची सतत मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी येथे दररोज लहान-मोठे अपघात होत असून नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येबाबत मनसेने यापूर्वीही प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार केला होता, परंतु प्रशासकीय पातळीवर केवळ दुर्लक्षच झाल्यामुळे नागरिकांमध्ये रोष पसरला आहे.
💥 प्रशासनाला अंतिम अल्टीमेटम 💥
जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे संतप्त झालेल्या मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू न झाल्यास, तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या इशाऱ्याची प्रत यवतमाळचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, वणीचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे.
🙏 उपस्थित, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते 🙏
हे निवेदन देताना मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात धिरज पेचे, प्रदीप बदकल, प्रवीण मांडवकर, सुरज गावंडे, रुपेश जोगी, गणेश मोहितकर, शुभम मस्की, संदीप काकडे, देविदास आवारी, निखिल दानव, वनिता आवारी, युवराज आवारी, योगेश नांदेकर, संजय वासेकार, विजय डवरे, किशोर सूर, रोहित झोडे यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक आणि मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




