माढेली :- डॉक्टर आणि कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे माढेळी येथील श्रेणी-१ चा पशुवैद्यकीय दवाखाना नेहमीच बंद राहत असून, याचा मोठा फटका परिसरातील शेतकरी व पशुपालकांना बसत आहे. विशेषत सोमवार हा माढेळीचा मुख्य बाजार दिवस असल्याने या परिसरातील सुमारे ३० खेड्यांमधील शेतकरी आपली आजारी किंवा उपचारासाठीची जनावरे घेऊन येतात परंतु दवाखाना बंद असल्यामुळे त्यांना नेहमीच निराश होऊन रिकाम्या हाताने परत जावे लागते.
🙏 त्रिवेणी संगमावरील महत्त्वाचे केंद्र 🙏
माढेळी हे क्षेत्र केवळ गावासूर नसून प्रसिद्ध बैल बाजार म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, येथून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्यांची सीमा एकत्र येते. त्यामुळे या त्रिवेणी संगमावरील विस्तृत परिसरातील हजारो शेतकरी व पशुपालक उपचारासाठी याच दवाखान्यावर अवलंबून आहेत.
🙏 शासकीय योजना कागदावरच 🙏माढेळी येथे शासनाकडून कोट्यवधी रुपयांची सुसज्ज अशी ‘स्मार्ट’ इमारत उभी करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात डॉक्टर, कंपाउंडर आणि शिपाई यांसारखी कोणतीही पदे भरली नसल्यामुळे ही संपूर्ण शासकीय योजना केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. आपत्कालीन व संकटकाळात जनावरांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागत असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
🙏 तातडीने डॉक्टर नियुक्तीची मागणी 🙏
शेतकऱ्यांच्या या ज्वलंत व गंभीर समस्येची दखल घेत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. माढेळी येथील दवाखान्यात तत्काळ डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हा दवाखाना नियमित सुरू करावा, अशी आक्रमक मागणी माजी सैनिक सचिन धात्रक यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
याप्रकरणी माजी सैनिक सचिन धात्रक यांच्यासह उपेंद्र हिकरे, विक्रम चंदनखेडे, वैभव देवतळे, जनार्धन आकूलवार आणि अन्य शेतकरी वर्ग आक्रमक असून, लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.




