वरोरा : – राष्ट्रसंतांच्या विचारांचा अखंड ठेवाही आणि भक्तीचा गजर! वरोऱ्यात ‘क्रांती ज्योती यात्रेचे’ मंगलमय आगमन.अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी येथून ९ ऑगस्ट रोजी प्रज्वलित झालेली ‘क्रांती ज्योती यात्रा’ विदर्भाचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण करत काल वरोरा येथे धडकली. शहीदांच्या स्मृतींना वंदन करत निघालेल्या या पवित्र यात्रेचे वरोरा येथील निवासस्थानी अत्यंत उत्साही, मंगलमय आणि भक्तीमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.
🙏 पादुका पूजन आणि उपस्थितांची मांदियाळी 🙏
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन व पूजन सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस पक्षाचे श्री. प्रवीण काकडे यांच्या हस्ते अत्यंत श्रद्धापूर्वक संपन्न झाले. या ऐतिहासिक सोहळ्यात अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख श्री. गोपाल कडू , माजी सर्वाधिकारी, श्री. लक्ष्मणराव गमे , विदर्भ प्रांत सेवाधिकारी, श्री. विठ्ठलराव सावरकर , चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी, श्री. रुपलालजी कावळे आणि वरोरा तालुका सेवाधिकारी श्री. संतोषराव जीवतोडे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर व गुरुदेव उपासक उपस्थित होते.
वरोरासह एकार्जुना, चिनोरा, पाझुर्णी, टेमुर्डा, जामणी, पाचगाव, वनोजा, मोहबाला, नायदेव, चिमूर व भद्रावती परिसरातील शेकडो महिला व पुरुष उपासक या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राष्ट्रसंतांच्या ‘सेवा, राष्ट्रभक्ती आणि समाजप्रबोधन’ या त्रिसूत्री विचारांचा अखंड दीप तेवत ठेवणारी ही क्रांती ज्योती यात्रा आज संपूर्ण विदर्भासाठी एक नवी ऊर्जा ठरत आहे.




