चरूरखटी :- स्थानिक पातळीवर तंटा आणि वाद मिटवून गावात शांतता व सलोखा टिकवून ठेवणाऱ्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अरुण बोधे यांची सलग पाचव्यांदा निवड करण्यात आली आहे. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत बोधेंनी आपल्या विजयाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अरुण बोधे आणि विनोद ठावरी यांच्यात थेट व आक्रमक लढत पाहायला मिळाली. मतदानात अरुण बोधे यांनी बाजी मारत तब्बल ८७ मते मिळवली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विनोद ठावरी यांना ४९ मतांवर समाधान मानावे लागले. एकूण मतांच्या गणिती आकडेवारीत बोधेंनी मोठ्या फरकाने विजय मिळवत गावकऱ्यांचा आपल्यावरील विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
सलग पाचव्यांदा या महत्त्वाच्या पदाची धुरा अरुण बोधे यांच्याकडे आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून विजयानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावातील सामाजिक सलोखा आणि एकता कायम ठेवण्यासाठी आगामी काळात आणखी जोमाने काम करणार असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.




