Home जिल्हा ‘रक्तदान हेच जीवनदान’: वरोरा पोलिसांची सामाजिक बांधिलकी; ४१ पोलिसांचे रक्तदान.

‘रक्तदान हेच जीवनदान’: वरोरा पोलिसांची सामाजिक बांधिलकी; ४१ पोलिसांचे रक्तदान.

वरोरा :-चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाच्या व वरोरा पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक दायित्वाचे भान राखत वरोरा पोलीस ठाण्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वरोरा पोलीस ठाण्यातील ४१ पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान केले. ‘रक्तदान हेच जीवनदान’ या उक्तीला अनुसरून पोलिसांच्या या उपक्रमामुळे परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.



🙏 वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी पुढाकार 🙏
बुधवारी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले. उपविभागीय पोलीस व पोलीस स्टेशनचे ठाणेदार या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात ‘जीवन ज्योती ब्लड सेंटर अँड कंपोनंट्स‘ यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले. गरजू रुग्णांना रक्ताची वेळेवर उपलब्धता व्हावी आणि नागरिकही या मानवतावादी कार्यात पुढे यावेत, या उदात्त हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले.



🙏 समाजात उमटले कौतुकाचे पडसाद🙏
केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखणे एवढीच जबाबदारी न समजता, सामाजिक कार्यातही पोलीस दल तत्पर आहे, हे या उपक्रमातून स्पष्ट झाले. रक्ताचा प्रत्येक थेंब गरजू रुग्णांचे प्राण वाचवू शकतो, ही भावना ठेवून पोलिसांचा हा उत्स्फूर्त सहभाग पाहून स्थानिक नागरिकही प्रेरित झाले आहेत. पोलिसांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे.