Home जिल्हा चारगाव खुर्द–वडधा मार्ग झाला खड्डेमय; बससेवा बंद होण्याची भीती, तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची...

चारगाव खुर्द–वडधा मार्ग झाला खड्डेमय; बससेवा बंद होण्याची भीती, तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी

वरोरा :- वरोरा तालुक्यातील चारगाव खुर्द फाटा ते वडधा या महत्त्वाच्या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. हा संपूर्ण रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत असल्याने अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे भविष्यात बससेवा बंद होण्याचीही भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



चारगाव खुर्द, वडधा, उमरी, साखरा, वडगाव, खापरी आदी गावांना वर्धा जिल्ह्याशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक येथे सुरू असते. शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी तसेच व्यापारी या रस्त्याचा नियमित वापर करतात. हिंगणघाट–शेगाव ही बस तसेच वरोरा आगाराच्या अनेक बसेस याच मार्गाने धावतात. मात्र मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही मोठी दुरुस्ती अथवा डांबरीकरण झाले नसल्याने आज रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.



रस्त्यावरील डांबरीकरण शोधूनही सापडत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असून “रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता?” असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात होण्याचा धोका अधिक वाढतो. याच कारणामुळे या मार्गावर अनेक लहान-मोठे अपघातही घडले आहेत.



मागील वर्षी वडधा गावासमोरील काही खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र पावसामुळे ते जैसे थेच झाले आहे. रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षाही अधिक बिकट झाली आहे. या मार्गावर वडधा, बोरगाव, उमरी, साखरा, वडगाव, आबमकता, येरखडा, पारडी अकोला, माकोना आणि गिरोला या गावांतील नागरिकांची सतत वर्दळ असते. शिक्षण, शेती, नोकरी व अन्य कामांसाठी दररोज शेकडो नागरिक या रस्त्याचा वापर करतात. मात्र खड्ड्यांमुळे त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.



विशेषतः चारगाव खुर्द फाटा ते वडधा या दरम्यान शेकडो खड्डे पडले असून हा पट्टा प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या मार्गाने लोकप्रतिनिधींचीही ये-जा असते. पण असे असतानाही अद्याप या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.



त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून सर्व खड्डे बुजवावेत, संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करावे आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.