वरोरा :-“ज्ञान हीच खरी शक्ती, शिक्षण हाच खरा विकासाचा मार्ग,” या उदात्त ध्येयवाक्याला केंद्रस्थानी ठेवून स्वर्गीय चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोराच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक अभिनव शैक्षणिक उपक्रम म्हणून ‘लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्रा’चा शुभारंभ आज, १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता कल्याणेश्वर हनुमान मंदिर परिसरातील जेतवन बुद्ध विहार (कॉलरी वॉर्ड, वरोरा) येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
समाजातील होतकरू, गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शिस्तबद्ध, प्रेरणादायी व सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे, हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. या ज्ञानयज्ञाच्या उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. भाजपचे ज्येष्ठ नेते मा. बाबासाहेब भागडे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा. मारोतराव घुमे उपस्थित होते. याप्रसंगी ‘Go With Structure’ उपक्रमाचे प्रणेते गोपाल गुढधे सर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या विविध पद्धतींवर विशेष मार्गदर्शन केले.
या शुभारंभ सोहळ्याला वरोरा नगरपरिषदेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, सार्वजनिक बांधकाम सभापती मनीषाऊ जेठानी, महिला व बालकल्याण सभापती रेखाताई तेलतुंबडे, सिनेट सदस्य सागर वझे, नगरसेविका मनीषा संजय दानव, योग शिक्षिका शीतल शैलेश मिटकर, केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुशजी आगलावे आणि जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुद्दीन छोटूभाई व अमित चवले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
“कोणताही विद्यार्थी पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासासाठी समान संधी मिळावी आणि ज्ञानाच्या बळावर सक्षम, सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडावेत,” हा संस्थेचा मुख्य संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले. संस्थेचे संस्थापक/संयोजक आशिष घुमे यांनी, “चला… एका विद्यार्थ्याला घडवूया, कारण एक विद्यार्थी घडला की एक कुटुंब, एक समाज आणि एक राष्ट्र घडते,” असे भावपूर्ण आवाहन उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाला स्थानिक परिसरातील नागरिकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या अभ्यास केंद्राचा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीत मोठा फायदा होणार असून, वरोरा परिसरातील विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वर्गीय चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.




