Home जिल्हा वरोरा नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; दूषित पाणी पुरवठ्यामुळे संताप.

वरोरा नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; दूषित पाणी पुरवठ्यामुळे संताप.

वरोरा:- वरोरा नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील कर्मचारी आणि ठेकेदारांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.




मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून २०२६ रोजी बंगाली कॉम्प्लेक्स समोर नगरपरिषदेतर्फे नवीन बोर कनेक्शनचे काम सुरू होते. हे काम करण्यासाठी जेसीबीने खोदकाम करत असताना पिण्याच्या पाण्याची मुख्य पाइपलाइन फुटली. याच दिवशी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरील घाण पाणी या फुटलेल्या पाइपलाइनमध्ये शिरले.




दुसऱ्या दिवशी, १४ जून २०२६ रोजी नगरपरिषदेने कोणतीही योग्य खबरदारी न घेता केवळ पाइपलाइनची वरवर दुरुस्ती केली आणि पाणी पुरवठा सुरू केला. विशेष म्हणजे, पाइपलाइनमधील घाण पाणी बाहेर काढण्यासाठी ‘एंड पाइप’ काढून कचरा काडने आवश्यक होते, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याचा परिणाम असा झाला की, शहरातील नळाद्वारे नागरिकांना दूषित आणि घाणेरडे पाणी पुरवण्यात आले.




💠 नागरिकांच्या जीवाशी खेळ 💠
नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या या बेजबाबदारपणामुळे नागरिक संतापले आहेत. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. मुजम्मिल मजीद शेख (सामाजिक कार्यकर्ते, कर्मवीर वॉर्ड) यांनी या प्रकाराबाबत उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
नगरपरिषदेचा हा कारभार प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून, नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रशासन आता काय ठोस पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.