मुंबई :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनाचा बिगुल वाजला आहे. येत्या २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे हे अधिवेशन पार पडणार असून, विधानसभा व विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
दिग्गजांची उपस्थिती, महत्त्वाच्या विषयांवर मंथन
विधानभवनात आयोजित या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. याशिवाय, सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे आणि सतेज पाटील यांसारख्या दिग्गज आमदारांनीही अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन, संभाव्य विधेयके आणि प्रश्नोत्तरांच्या तासावर सविस्तर चर्चा केली.
सरकारसमोर जनसामान्यांचे कळीचे प्रश्न
हे अधिवेशन राज्य सरकारसाठी अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे. अधिवेशनात प्रामुख्याने खालील विषयांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा आहे:
💠 पायाभूत सुविधा :- राज्यातील रखडलेले प्रकल्प आणि विकासाचा वेग.
💠 शेतकरी व कृषी :- शेतीशी संबंधित प्रश्न आणि बळीराजाच्या समस्या.
💠 शिक्षण व रोजगार :-तरुणांच्या भविष्याशी निगडित प्रश्न.
💠 कायदा-सुव्यवस्था :- राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था परिस्थिती.
💠 नागरिकांचे दैनिक प्रश्न :- सामान्य जनतेच्या रोजच्या जगण्याशी संबंधित समस्या.
आता या पावसाळी अधिवेशनात सरकार कोणती महत्त्वाची विधेयके मांडणार आणि विरोधकांच्या प्रश्नांना कसे उत्तर देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Home Breaking News महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून; जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सरकारची ‘अग्निपरीक्षा’!




