माढेळी :- माढेळी-गीरसावळी मार्गाची दुरवस्था; जबाबदारांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली.दिंडोळा बॅरेज प्रकल्पाच्या पाईपलाईन कामामुळे परिसरातील रस्ते अक्षरशः चाळण झाले आहेत. सार्वजनिक विकासकामांच्या नावाखाली कंत्राटदाराने केलेल्या मनमानी कारभारामुळे माढेळी–गीरसावळीसह अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नागरिकांचे हाल होत आहेत. या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी आता संबंधित विभाग आणि कंत्राटदारावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
काम ६० टक्के पूर्ण, पण रस्ते मात्र ‘बेवारस’
दिंडोळा बॅरेज प्रकल्पांतर्गत दहा किलोमीटर परिसरातील शेतीसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आतापर्यंत सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, हे काम करताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या पांदण आणि पक्क्या डांबरी रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ते मूळ स्थितीत आणणे बंधनकारक असताना, कंत्राटदाराने केवळ माती टाकून किंवा कामचलाव मलमपट्टी करून डोळेझाक केली आहे.
पावसाने उघडले पोलखोल
नुकत्याच झालेल्या पावसामुळे माढेळी–गीरसावळी रोडवर जागोजागी खड्डे पडून रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत या खराब रस्त्यांवरून प्रवास करताना रुग्ण, शाळकरी मुले आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून फिरावे लागत आहे. अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा संताप आहे.
कारवाई कधी होणार ?
सार्वजनिक निधीचा वापर करून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये रस्ते पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि ‘SSFM ग्रुप, नागपूर’ या कंत्राटदार कंपनीवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी सैनिक सचिन धात्रक यांनी मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
नुकसानग्रस्त रस्त्यांची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करून प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Home Breaking News दिंडोळा बॅरेजच्या कामात रस्ते ‘उद्ध्वस्त’; प्रशासकीय गलथानपणामुळे नागरिक त्रस्त !




