Home Breaking News पर्यावरण रक्षणाचा विडा; ‘बी संकलन अभियानातून’ वृक्षवल्ली फुलवण्याचे ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी...

पर्यावरण रक्षणाचा विडा; ‘बी संकलन अभियानातून’ वृक्षवल्ली फुलवण्याचे ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी यांचे आवाहन

वरोरा :-वाढते तापमान, बेभरवशी पाऊस आणि पर्यावरणाचे बिघडलेले चक्र यांसारख्या समस्यांनी आज मानवासमोर मोठे संकट उभे केले आहे. या नैसर्गिक आव्हानांवर मात करण्यासाठी आता ‘वृक्षलागवड’ हाच एकमेव शाश्वत पर्याय उरला आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन, ज्येष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी यांनी ‘बी संकलन अभियान’ हाती घेतले असून, या मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्यांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे.
एक बीज – हजारो वृक्ष’ चा संकल्प’
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मागील वर्षीप्रमाणेच यंदाही अत्यंत प्रभावीपणे हे अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिंच, आंबा, कडूनिंब आणि साग यांसारख्या उपयुक्त वृक्षांच्या बियांचे संकलन केले जाणार आहे. यातून भविष्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षनिर्मिती होऊन निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल, असा विश्वास श्याम ठेंगडी यांनी व्यक्त केला.
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
वाढत्या वृक्षतोडीमुळे हवामान बदलाचे दुष्परिणाम अधिक तीव्र होत आहेत. तापमानाचा वाढता पारा पाहता, आता प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात खारीचा वाटा उचलणे काळाची गरज आहे.
कसे सहभागी व्हाल ?
नागरिकांनी आपल्या परिसरातील चिंच, आंबा, कडूनिंब आणि सागाच्या बिया गोळा करून या मोहिमेला सहकार्य करावे.
संपर्क :- ज्या नागरिकांना प्रत्यक्ष बिया पोहोचविणे शक्य नसेल, त्यांनी  ☎️ ९२२६१३५२४०  या क्रमांकावर संपर्क साधावा. बियांचे संकलन करण्यासाठी स्वतः येण्याची तयारीही श्याम ठेंगडी यांनी दर्शविली आहे.
निसर्ग वाचवण्यासाठी पुकारलेल्या या ‘एक बीज – हजारो वृक्ष’ उपक्रमाला वरोरा आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.