Home Breaking News मारेगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; मनसेचे ‘इंजिन’ सुसाट, राजू उंबरकरांचा पोलिसांना थेट इशारा!...

मारेगावात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; मनसेचे ‘इंजिन’ सुसाट, राजू उंबरकरांचा पोलिसांना थेट इशारा! दोन दिवसांत कारवाई करा, अन्यथा पोलीस स्टेशनला घेराव घालणार; खंडणी, मेंढणी, जाणकाई पोड परिसरातील ग्रामस्थ आक्रमक

मारेगाव :- मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात सध्या अवैध धंद्यांनी थैमान घातले असून, पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता थेट शड्डू ठोकला आहे. “पोलिसांनी हप्ता वसुली थांबवून, अवैध धंद्यांवर हातोडा चालवावा, अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल,” असा सडेतोड इशारा मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिला आहे.
तालुक्यातील खंडणी, मेंढणी आणि जाणकाई पोड या गावांमध्ये अवैध दारू विक्री, मटका, जुगार आणि क्लब खुलेआम सुरू आहेत. विशेष म्हणजे, या गावांतील महिलांनी आणि ग्रामपंचायतींनी दारूबंदीचा प्रस्ताव देऊनही मारेगाव येथील पोलीस स्टेशनचे अधिकारी याकडे हेतुपुरस्सर व आपल्याला मिळणाऱ्या मलिद्यासाठी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अवैध दारूमुळे गावागावात भांडणे वाढली असून कौटुंबिक हिंसाचाराने अनेक सुखी संसारे उघड्यावर आली आहेत. शाळा-कॉलेजला जाणारी तरुण मुले या व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या समस्यांचा पाढा वाचण्यासाठी राजू उंबरकर यांनी शेकडो ग्रामस्थांसह मारेगाव पोलीस स्टेशन गाठले. यावेळी पोलीस निरीक्षकांशी झालेल्या चर्चेदरम्यान चांगलीच खडाजंगी उडाली. सुरुवातीला पोलीस अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उंबरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत “जोपर्यंत ठोस कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ठाण्यातून हलणार नाही,” अशी भूमिका घेतल्याने पोलिसांची धावपळ उडाली.
पोलीस प्रशासनावर जनतेचा धाक उरलेला नाही की पोलीसच या धंदेवाल्यांना पाठीशी घालत आहेत? असा सवाल उंबरकर यांनी उपस्थित केला. खंडणी आणि इतर गावांमध्ये ग्रामस्थांनी तक्रारी करूनही पोलीस कारवाई का करत नाहीत? ही ‘अर्थपूर्ण’ शांतता कशासाठी? अशा शब्दांत उंबरकर यांनी पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढले.
ग्रामस्थांचा वाढता रोष आणि मनसेचा आक्रमक पवित्रा पाहून पोलीस निरीक्षकांनी अखेर माघार घेतली. येत्या २ ते ३ दिवसांत संबंधित गावातील अवैध दारू विक्री आणि मटका अड्ड्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन लेखी स्वरूपात देण्याचे कबूल केले.
“आम्ही पोलिसांना केवळ दोन-तीन दिवसांचा वेळ दिला आहे. जर या काळात तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले नाहीत, तर मारेगाव पोलीस स्टेशनसमोर तीव्र ठिय्या आंदोलन केले जाईल. जनतेच्या शांततेसाठी आणि भावी पिढीच्या भविष्यासाठी आमचा हा लढा यापुढेही असाच धगधगत राहील.” — राजू उंबरकर (नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

🙏 जय विदर्भ 🙏