Home Breaking News जनतेच्या खिशावर सरकारचा दरोडा! पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीने महागाईचा भडका.

जनतेच्या खिशावर सरकारचा दरोडा! पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीने महागाईचा भडका.

वरोरा :-देशातील आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिक आधीच वाढती महागाई, बेरोजगारी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असताना, सरकारने पुन्हा एकदा सामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढवून काही दिवस उलटत नाहीत, तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर तब्बल ३ रुपयांची मोठी वाढ करून सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात संपूर्ण वरोरा तालुक्यासह देशोन्देशी जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
👉 गॅस महाग, सीएनजी महाग, आता इंधनही महाग; सर्वसामान्यांनी जगायचं तरी कसं ?
एकीकडे सरकार ‘अमृतकाळ’, ‘विकास’ आणि ‘विश्वगुरू’ अशा मोठमोठ्या घोषणांचा सुकाळ करत आहे, तर दुसरीकडे सामान्य नागरिकाचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. मुंबईत पेट्रोल १०६.६८ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९३.१४ रुपयांवर पोहोचले आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०७.९३ रुपये तर डिझेल ९४.४१ रुपये प्रति लीटर झाले आहे. पुणे, नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर, ठाणे, सोलापूर, जळगाव आणि परभणीसह राज्यातील अनेक शहरांमध्ये इंधन दरांनी शंभरी पार केली आहे. कोलकात्यात पेट्रोल थेट १०८.७४ रुपयांवर पोहोचले असून दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये नागरिक या दरवाढीने होरपळून निघत आहेत.
👉 “दुकान चालवायचं, घर चालवायचं, ईएमआय भरायचा की गाडीत पेट्रोल टाकायचं?” असा संतप्त सवाल आता मध्यमवर्गीय आणि कष्टकरी कुटुंबांतून विचारला जात आहे.

👉 आंतरराष्ट्रीय बाजाराचे खोटे कारण आणि जनतेची लूट
सरकारकडून अमेरिका-इराण संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव आणि जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले तरी देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होत नाही, पण दर वाढले की लगेच जनतेच्या खिशावर कात्री चालवली जाते. सरकार जनतेला दिलासा देण्याऐवजी केवळ स्वतःचे खिसे भरण्याचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
👉 वाहतूक खर्च वाढल्याने सर्वच वस्तू कडू होणार !
इंधन दरवाढीचा थेट फटका आता प्रत्येक घटकाला बसणार आहे. वाहतूक खर्च वाढल्यामुळे बाजारातील:
🚫 भाजीपाला, दूध, आणि धान्य महागणार.
🚫 बांधकाम साहित्य आणि प्रवासाचे भाडे वाढणार.
🚫 दैनंदिन गरजेच्या सर्वच वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
म्हणजेच, पेट्रोल-डिझेलची ही दरवाढ नसून महागाईच्या नव्या आगीची ही केवळ सुरुवात असल्याचे आर्थिक जाणकार सांगत आहेत.
👉 सत्ताधारी घोषणांच्या धुंदीत, जनता सहनशीलतेच्या उंबरठ्यावर !
सामान्य माणूस दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या कोलमडत असताना सत्ताधारी मात्र घोषणांच्या फुग्यात रमले आहेत. जनतेला फक्त आणि फक्त दरवाढीच्या खाईत ढकलणे, हाच सरकारचा विकास मॉडेल आहे का? असा संतप्त सवाल आता वरोऱ्यातील चौकाचौकांतून विचारला जात आहे. आता प्रश्न फक्त पेट्रोल-डिझेलचा नाही, तर जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा ठरत आहे. सरकार यावर काही नियंत्रण आणणार की जनतेचा असाच छळ सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
👉 ‘स्वतंत्र विदर्भ न्यूज’, वरोरा.

🙏 जय विदर्भ🙏