Home Breaking News वरोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षिततेसाठी खासदार प्रतिभा धानोरकर मैदानात पावसाळापूर्व कामांचे नियोजन...

वरोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षिततेसाठी खासदार प्रतिभा धानोरकर मैदानात पावसाळापूर्व कामांचे नियोजन व विविध जनसुविधांचे लोकार्पण

 

वरोरा : वरोरा शहराला पूरमुक्त ठेवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज प्रत्यक्ष मैदानावर उतरून शहराचा दौरा केला. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेऊन शहरातील नाल्यांची पाहणी केली. नाल्यांचे खोलीकरण आणि स्वच्छता युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच, “वरोरा शहराची सुरक्षा आणि स्वच्छता हीच आमची प्राथमिकता आहे,” असा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला.

शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा आणि संभाव्य नैसर्गिक आपत्ती टाळता यावी, यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष नियोजन करण्यात आले. याप्रसंगी वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, गटनेते, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वरोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक, वेकोलिचे क्षेत्रीय मॅनेजर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय समन्वयातून पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे वेळेत पूर्ण करून वरोरा शहराला ‘सक्षम आणि सुरक्षित शहर’ बनवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

केवळ आपत्ती व्यवस्थापनच नव्हे, तर शहराच्या मूलभूत सोयीसुविधांकडेही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ‘नागरी दलितोत्तर वस्ती सुधारणा योजना २०२५-२६’ अंतर्गत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते विविध जनसुविधांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून अभ्यंकर वॉर्डात नवीन ‘वॉटर ए.टी.एम.’ आणि १७.६५ लक्ष रुपये खर्चाचे अत्याधुनिक जल शुद्धीकरण संयंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून, तो पूर्ण करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

या विकास दौऱ्यादरम्यान प्रभाग क्र. ४ मधील झोपला मारोती देवस्थान परिसरात भाविकांसाठी नवीन हातपंप आणि १ HP पंपासह पाण्याची टाकी बसवून पाणी पुरवठ्याची मोठी समस्या मार्गी लावली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे आणि लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे वरोरा शहरात विकासाची नवी गती पाहायला मिळत आहे.

🙏 जय विदर्भ 🙏