वणी :- विषय किशोर भागडे (वरोरा )
रिलायन्स जिओ मार्टमधील पार्सल रायडर्सच्या मानधनात झालेली कपात मागे घेण्यास प्रशासनाला भाग पाडल्याबद्दल, आज वणीतील तरुण डिलिव्हरी बॉईजनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांचे जंगी आभार मानले. स्थानिक ‘शिवमुद्रा’ जनसंपर्क कार्यालयात या युवकांनी राजु उंबरकर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा भेट दिली आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना रायडर्सनी भावना व्यक्त केल्या की, “गेल्या सहा महिन्यांपासून आमचे मानधन ५० रुपयांवरून थेट २५ रुपयांपर्यंत खाली आणले गेले होते. महागाईच्या काळात घर चालवणे कठीण झाले असताना मनसे आमच्यासाठी धावून आली. राजु उंबरकर यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळेच आज आमचे मानधन पुन्हा ३० रुपये झाले आहे.” या संकटकाळात मनसेने जो आधार दिला, तो आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या आंदोलनाच्या यशाची पार्श्वभूमी अशी की, जिओ मार्टमध्ये काम करणाऱ्या या तरुणांना विमा कवच नव्हते आणि मानधनातही अन्यायकारक कपात केली जात होती. यावर राजु उंबरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. “श्रमिकांच्या घामाची चोरी थांबवा, अन्यथा काम बंद पाडू,” या इशाऱ्यामुळे कंपनी प्रशासनाला नमावे लागले.
रायडर्सच्या या सत्कार स्वीकारल्यानंतर राजु उंबरकर यांनी तरुणांना आश्वस्त केले की, “मराठी मुलांच्या आणि कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तत्पर आणि आक्रमक राहील. कुणीही कामगारांचे शोषण करत असेल, तर मनसे स्टाईलने त्याला उत्तर दिले जाईल.” या यशस्वी आंदोलनामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण असून मनसेचा प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.
🙏 जय विदर्भ 🙏




