बंगळुरू : आयपीएल 2024 मध्ये शनिवारी आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना झाला. प्लेऑफ गाठण्यासाठी करो या मरो अशी स्थिती दोन्ही संघांसाठी होती. यात आरसीबीने चेन्नईला 27 धावांनी हरवून प्लेऑफ गाठली.आरसीबीने यासह अशक्य अशी गोष्ट शक्य करून दाखवली. पहिल्या 8 सामन्यात त्यांना 7 पराभव बघावे लागले होते. त्यातही त्यांनी सलग सहा पराभवांचा सामना केला होता. मात्र त्यानंतर जोरदार मुसंडी मारत आरसीबीने सलग सहा सामने जिंकून थेट प्लेऑफ गाठली.
आयपीएल 2024 मध्ये आरसीबी, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचे प्रत्येकी 14 गुण आहेत. मात्र धावगतीच्या जोरावर आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं. चेन्नईविरुद्ध आरसीबीला फक्त विजय पुरेसा नव्हता. 219 धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईला 18 धावांनी हरवायचं होतं. आरसीबीने चेन्नईला 191 धावांवरच रोखून बाजी मारली. या विजयामुळे त्यांची धावगती 0.459 झाली तर चेन्नईची धावगती 0.392 झाली. दिल्ली आणि लखनऊची धावगती कमी असल्याने ते आधीच बाहेर पडले होते.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात जे घडलं नाही ते आरसीबीने करून दाखवलंय. पहिल्या 8 सामन्यात फक्त एक विजय त्यांना मिळवता आला होता. त्यानंतरही आरसीबीने प्लेऑफमध्ये धडक मारली. याआधी त्यांनी 2016 च्या आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. त्या हंगामाप्रमाणे यावेळीही आरसीबीने शेवटच्या 7 सामन्यात 6 विजय मिळवले. तेव्हा त्यांनी सुरुवातीला 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले होते.
आरसीबीने एकाच हंगामात सलग सहा पराभव पाहिले. त्यानंतर एकाच हंगामात सलग सहा सामन्यात विजय मिळवला. सलग सहा पराभव आणि सलग सहा विजय एकाच हंगामात पाहणारा RCB पहिलाच संघ ठरलाय. 2010 मध्ये डेक्कन चार्जर्स, 2020 मध्ये पंजाब किंग्ज आणि 2022 मध्ये सनरायजर्स हैदराबादने सलग पाच विजय आणि सलग पाच पराभव पाहिले होते.



