Home राजकारण ई-केवायसी न केल्याचा ९४ हजार शेतकऱ्यांना फटका!

ई-केवायसी न केल्याचा ९४ हजार शेतकऱ्यांना फटका!

ई-केवायसी न केल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ९४ हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दरम्यान, ई-केवायसी न केल्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणा किंवा अन्य शासकीय योजनांचा लाभ ही या शेतकऱ्यांना मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची भीती आहे.दुसरीकडे ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय या शेतकऱ्यांची लाभाची रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्राधान्याने ई-केवायसी करावी, असे आवाहनच त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख ४२ हजार ८२४ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे.

यातील ८ लाख २४ हजार ८३१ शेतकऱ्यांच्या माहितीला मंजुरीही देण्यात आली आहे. दरम्यान, २ लाख ३६ हजार २७७ शेतकऱ्यांची माहिती अद्यापही अपलोड करणे बाकी आहे. दुसरीकडे विविध योजनेंतर्गत ७ लाख १६ हजार ८३९ शेतकऱ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले आहे.

मात्र, ९४ हजार ६२८ शेतकऱ्यांची ई- केवायसी प्रलंबित असल्यामुळे त्यांना लाभाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई- केवायसी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून विविध योजनेत दिली जाणारी मदत, अनुदान ई-केवायसी प्रलंबित असल्याने ती मिळण्यास अडचण जाते. शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

ई- केवायसीअभावी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय व तालुक्यातील कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्तीचीही मिळाली नाही मदत : ई-केवायसी न केलेल्या जिल्ह्यातील ८० हजार ७०० शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचीही रक्कम मिळालेली नाही. गेल्या ३ वर्षात जिल्ह्यात ६८० कोटी रुपयांचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे झाले होते.

तालुकानिहाय ई-केवायसी प्रलंबित असलेले शेतकरी

चिखली – १७,५०७

लोणार – ११,४६३

बुलढाणा – १०,४५४

मेहकर – १०,६३७

दे. राजा – ७,८९४

सी.राजा – ७,४५५

संग्रामपूर – ६,५०२

नांदुरा – ६,२७१

जळगावला जा. – ५,८९७

मलकापूर – ३,५११

शेगाव – २,७७२

मोताळा – २,४९३

खामगाव – १,७७२