Home राजकारण आता आम्ही स्वावलंबी; आरएसएसच्या पाठिंब्याबाबत जेपी नड्डी नेमकं काय म्हणाले.

आता आम्ही स्वावलंबी; आरएसएसच्या पाठिंब्याबाबत जेपी नड्डी नेमकं काय म्हणाले.

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  नाते तसे जुने आहे. मात्र विरोधक नेहमी आरोप करतात की, भाजपा आरएसएसच्या इशाऱ्यावर चालते. अशातच आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका मुलाखतीदरम्यान आरएसएस भाजपाची वैचारिक आघाडी असल्याचे वर्णन केले आहे.तसेच भाजपा पक्षाची रचना मजबूत झाली असून आम्ही स्वबळावर चालतो, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

अटलबिहारी वाजपेयी युगाच्या तुलनेत भाजपामधील आरएसएसची उपस्थिती कशी बदलली आहे? असा प्रश्न जेपी नड्डी यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, वाजपेयींच्या काळात पक्षाला स्वतःला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती, कारण त्यावेळी भाजपा अकार्यक्षम आणि लहान पक्ष होता. पण आज पक्ष मोठा झाला आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाला आहे. भाजप आता स्वतःचा पक्ष स्वत: चालवतो, हाच फरक आहे, असेही जेपी नड्डा यांनी म्हटले.

भाजपाला आरएसएसच्या पाठिंब्याची गरज आहे का? असे विचारले असता जेपी नड्डा म्हणाले की, भाजपा पक्ष आता मोठा झाला आहे आणि पक्षाचे नेते त्यांची कर्तव्ये आणि भूमिका पार योग्य रितीने पार पाडत आहेत. आरएसएस ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे, तर भाजपा हा राजकीय पक्ष आहे. आरएसएस वैचारिकपणे काम करत आहे. परंतु आम्ही आमचा कारभार आमच्या पद्धतीने हाताळतो आहोत आणि हेच राजकीय पक्षांनी केले पाहिजे. तसेच मथुरा आणि वाराणसीच्या वादग्रस्त जागेवर मंदिरे बांधण्याची भाजपाची अशी कोणतीही कल्पना, योजना किंवा पक्षाची इच्छा नाही. त्यावरही कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही जेपी नड्डा म्हणाले.

दरम्यान, आरएसएसची स्थापना 27 सप्टेंबर 1925 रोजी झाली होती. सध्याच्या काळात मोहन भागवत हे आरएसएस संघटनेचे नेतृत्व करतात. भाजपाची स्थापना झाल्यानतंर आरएसएस हे भाजपाचे वैचारिक गुरु राहिले आहेत. यामुळे पक्षाला उदयोन्मुख संघटनेतून राजकीय दिग्गज बनण्यास मदत झाल्याचे मानले जाते. भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते संघाचे कार्यकर्ते आणि सदस्य आहेत.