नवी मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 20 मे 2024 रोजी निवडणूक होत असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध प्रसार माध्यमांचा व साधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे.अशाच प्रकारे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेत 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघ कार्यालय तसेच 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालय यांच्याशी समन्वय साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांकरिता 360 व्हीलचेअर पुरवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व स्वच्छतागृहांची व्यवस्था पाहण्यात येत आहे.मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती सहजपणे होण्यासाठी शहरातील चौकांमध्ये दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केंद्राची नेमकी स्थळे दर्शविणारे क्यू आर कोड असलेले फलक प्रदर्शित केले जात आहेत.
याशिवाय मतदान जनजागृती अंतर्गत मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी बिल्ले तयार करण्यात आले असून ते महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच स्वच्छताकर्मी आपल्या छातीवर प्रदर्शित करून मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आशा वर्करमार्फतही मतदानाच्या दिवशी घराघरातील मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले जाणार आहे.
त्यासोबतच नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य पथके व रुग्णवाहिकाही सुसज्ज असणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने सुरूवातीपासूनच स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून त्यामध्ये चौकाचौकांमध्ये पथनाट्य सादरीकरण, मॉल्समध्ये फ्लॅश मॉबसारखा आकर्षित करून घेणारा उपक्रम, चित्रपटगृहांमध्ये व्हिडिओ क्लिपद्वारे मतदान जनजागृती, महानगरपालिकेच्या सर्व सोशल मीडिया माध्यमांद्वारे प्रशांत दामले, भरत जाधव, कविता लाड अशा नामवंत कलावंतांच्या चित्रफिती प्रदर्शित करून तसेच ग्राफिक प्रदर्शित करून मतदान करण्याचे केलेले आवाहन, चौकाचौकांमध्ये फ्लेक्स होर्डिंगद्वारे तसेच डिजिटल होर्डिंगद्वारे केलेली जनजागृती, नवी मुंबई महानगरपालिकेच्या 400 हून अधिक एनएमएमटी बसेस व बसस्टॉपवर बॅनरव्दारे केलेली प्रसिद्धी तसेच एनएमएमटी चालक व वाहक यांनी मतदानाचा संदेश प्रसार करणारी गांधी टोपी घालून केलेली मतदार जागृती, नवी मुंबई महानगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या 200 हून अधिक वाहनांवर मतदार जनजागृतीचे जिंगल प्रसारण, मालमत्ता देयकांवरुन तसेच रुग्णालयातील केसपेपरवरून मतदान करण्याचे केलेले आवाहन, ठिकठिकाणी लावलेले सेल्फी पॉईंट – अशा कल्पक संकल्पना राबवत व्यापक जनजागृती करण्यात आली.
शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या रॅली काढून तसेच शाळा शाळांमध्ये निबंध, चित्रकला, रांगोळी, गायन, वक्तृत्व असे नानाविध उपक्रम राबवून मतदान जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे 1 लाख 3 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या आई-बाबांना पत्र लिहून मतदानाचे आवाहन केले. अशा सर्वच अभिनव उपक्रमांची दखल नागरिकांप्रमाणेच निवडणूक आयोगाकडूनही घेतली गेली.
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महानगरपालिका निवडणुकीच्या दिवसापर्यंत अधिक प्रभावीपणे प्रचार मोहीम राबवणार असून त्याविषयी या बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली व नियोजन करण्यात आले.



