वरोरा :- वरोरा येथील मारवाडी स्मशानभूमीचा मोठा लोखंडी गेट अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी काल वरोरा पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार नोंदविण्यात आली असून, यापूर्वीच कालभैरव पोलीस स्टेशनमध्येही यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिककार्यकर्ते मनीष जयस्वाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे.मृत व्यक्तींच्या अंतिम संस्काराच्या पवित्र ठिकाणाला आणि स्मशानघाटाच्या साहित्यालाही चोरट्यांनी सोडले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणाहून सुरक्षा भिंत किंवा गेट चोरीला जाणे म्हणजे प्रशासनाच्या आणि सुरक्षेच्या चिंध्या उडाल्यासारखे आहे. उघडपणे सुरू असलेल्या अशा चोऱ्यांमुळे चोरट्यांचे मनोधैर्य वाढल्याचे स्पष्ट होते.
शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वरोरा पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत चोरट्यांचा शोध घ्यावा आणि लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी नागरिक व सामाजिक वर्तुळातून होत आहे.




