Home जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाच्या स्मरणार्थ ‘क्रांतीज्योत यात्रा’ वरोऱ्यात

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाच्या स्मरणार्थ ‘क्रांतीज्योत यात्रा’ वरोऱ्यात

वरोरा :- भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हजारो कुटुंबे बेचिराख झाली, हजारो क्रांतिकारक फासावर गेले, तर लाखो देशभक्त इंग्रजांच्या गोळीबारात शहीद झाले. या सर्व शहीद हुतात्म्यांच्या बलिदानातूनच भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला.



या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. मात्र, या महान क्रांतीयोध्याचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात किंचितही उल्लेख नाही, तसेच भारताच्या राष्ट्रपुरुषांच्या यादीत अद्यापही राष्ट्रसंतांच्या नावाचा उल्लेख नाही. ही माहिती जनता व शासनापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.आज देशातील एकूण वातावरण पाहता भारतीयांना या हुतात्म्यांच्या बलिदानाचा विसर पडत चालला आहे, असे अत्यंत खेदाने म्हणावे लागते. त्यामुळे शहीद हुतात्म्यांच्या त्यागाची व बलिदानाची जाणीव जनतेला करून देणे तसेच लोकांच्या मनात राष्ट्रीय भावना जागृत करणे, या उद्देशाने अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम यांच्या वतीने अमरावती व नागपूर विभागात क्रांतीज्योत यात्रा दि. ९ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.



या क्रांतीज्योत यात्रेचा अमरावती विभागातील मार्ग व कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून, ही यात्रा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी वरोरा नगरीत आगमन करणार आहे.याबाबत वरोरा तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सदस्य (पुरुष व महिला) तसेच वरोरा शहरातील गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व उपासक यांना सूचित करण्यात आले आहे.

क्रांतीज्योत यात्रेचे सकाळी ठीक ९.०० वरोरा  श्री गजानन महाराज मंदिर कर्मवीर वार्ड वरोरा येथे आगमन होईल व येथुन पुढील कार्यक्रमाला सुरुवात होईल.

त्यानंतर सकाळी ९.३० वाजता मा. श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर, खासदार, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र यांच्या निवासस्थानी क्रांतीज्योत यात्रेचे स्वागत व पूजन करण्यात येणार आहे.यानंतर सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत आलिशान सभागृह, वरोरा येथे क्रांतीज्योत यात्रेचे स्वागत व पूजन, मा.श्री अहतेशाम अली , वरोरा नगराच्या नगराध्यक्षा – सौ. अर्चनाताई ठाकरे, हे करतील लगेच कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम व भोजनाची व्यवस्था श्री अहतेशाम अली माजी नगराध्यक्ष – वरोरा यांनी आयोजित केली आहे.



नंतर क्रांतीज्योत यात्रा पुढील प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे.

या क्रांतीज्योत यात्रेच्या मार्गातील जनता जनार्दनांनी नमूद ठिकाणी यात्रेचे स्वागत करावे, तसेच यात्रेदरम्यान होणाऱ्या प्रबोधनाला जास्तीत जास्त वेळ द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शक्य त्या ठिकाणापर्यंत आपल्या वाहनाने क्रांतीज्योत यात्रेसोबत मार्गस्थ होऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

क्रांतीज्योत यात्रेच्या या कार्यक्रमाला वरोरा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला-पुरुष सदस्य तसेच गुरुदेव सेवा मंडळाच्या उपासकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या आवाहनावर श्री. लक्ष्मणराव गमे, माजी सर्वाधिकारी व अन्नदान विभाग प्रमुख; प्रा. रूपलाल कावळे, चंद्रपूर जिल्हा प्रचार प्रमुख; श्री. वसंतराव निखाडे, वरोरा तालुका सेवाधिकारी; श्री. संतोषराव जीवतोडे, वरोरा तालुका प्रचारप्रमुख; तसेच सौ. चंद्रकला मत्ते, वरोरा तालुका महिला सेवाधिकारी यांनी केले आहे.

🇮🇳 शहीद हुतात्म्यांच्या बलिदानाला अभिवादन करत राष्ट्रीय भावना जागृत करण्याचा संदेश देणारी ही क्रांतीज्योत यात्रा वरोरा नगरीत येत असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.