चंद्रपूर :-गुन्हे उकलण्यासोबतच नागरिकांचा हरवलेला आणि चोरीस गेलेला मौल्यवान ऐवज पुन्हा त्यांच्या हाती सोपविण्यात चंद्रपूर पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने तब्बल ३ कोटी ५९ लाख ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ तक्रारदार व मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता पोलीस बहुउद्देशीय सभागृह, तुकूम, चंद्रपूर येथे भव्य मुद्देमाल हस्तांतरण सोहळा उत्साहात पार पडला.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. अशोक उईके यांच्या शुभहस्ते संबंधित तक्रारदारांना मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. नव्या भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तूंची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या.
ट्रक, गॅस सिलेंडरपासून दुचाकीपर्यंत मुद्देमाल परत
पडोली पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील अशोक लेलँड ट्रक, ३४२ गॅस सिलेंडर आणि रोख रक्कम, असा एकूण ३९ लाख ६८ हजार ५३१ रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. तसेच राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हस्तगत करण्यात आलेले ३१ लाख रुपये किमतीचे टाटा आयशर वाहन संबंधित मालकाच्या स्वाधीन करण्यात आले.
याशिवाय जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या रॉयल एनफिल्ड बुलेट, होंडा शाईन, स्प्लेंडर आणि ॲक्सेस मोपेड यांसारख्या दुचाकींचाही शोध घेऊन त्या मूळ मालकांना परत करण्यात आल्या.
लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिनेही परत
रामनगर, बल्लारपूर, सावली आणि घुग्घूस पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेले सोन्याचे पाटल्या, चपलाकंठी, पोत, अंगठ्या, लॉकेट, सोन्याचे लंगड तसेच चांदीची भांडी व नाणी तक्रारदारांना परत करण्यात आली.
यामध्ये रामनगर येथील ३४.१६ लाख रुपये, बल्लारपूर येथील १८.२३ लाख रुपये, सावली येथील १४.७५ लाख रुपये आणि घुग्घूस येथील ५.४१ लाख रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
सायबर ठगांनाही पोलिसांचा जोरदार दणका
ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी सायबर सेलनेही प्रभावी कामगिरी केली. NCCRP प्रणालीच्या माध्यमातून तातडीने कारवाई करत तब्बल १२ लाख ४८ हजार २३७ रुपये सायबर फसवणुकीतील तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आले.
विविध गुन्ह्यांमध्ये पडोली व रामनगर पोलिसांनी हस्तगत केलेली ९ लाख ४७ हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम देखील संबंधितांच्या स्वाधीन करण्यात आली.
हरवलेले मोबाईलही शोधून नागरिकांच्या हाती
CEIR पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हरवलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यात आले. शोध लागलेले मोबाईल थेट संबंधित तक्रारदारांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यामुळे मौल्यवान वस्तू परत मिळण्यासोबतच पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन पोलीस ठाण्यांचा गौरव
मुद्देमाल जप्ती आणि तो मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील टॉप-३ पोलीस ठाण्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
प्रथम क्रमांक – रामनगर पोलीस स्टेशन
मुद्देमाल : ६५ लाख ५५ हजार ७३० रुपये
ठाणे प्रभारी : पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके
मुद्देमाल हेड मोहरर : सौ/२०१० श्री. अनिल आत्राम
द्वितीय क्रमांक – बल्लारशा पोलीस स्टेशन
मुद्देमाल : ३० लाख २४ हजार १४९ रुपये
ठाणे प्रभारी : पोलीस निरीक्षक श्री. विपिन इंगळे
मुद्देमाल हेड मोहरर : पोहेवा/१६१ श्री. श्रीकांत मेंढे
तृतीय क्रमांक – सावली पोलीस स्टेशन
मुद्देमाल : १५ लाख ६५ हजार ३२० रुपये
ठाणे प्रभारी : पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप पुल्लरवार
मुद्देमाल हेड मोहरर : पोहेवा/२४८४ श्री. विनोद वाघमारे
या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी व मुद्देमाल हेड मोहरर यांना पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते विशेष प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
🙏 मान्यवरांची उपस्थिती 🙏
या कार्यक्रमाला महापौर सौ. संगिता खांडेकर, खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, आमदार श्री सुधाकर अडबाले, श्री सुधीर मुनगंटीवार, श्री किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी श्रीमती वसुमना पंत (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुलकित सिंह (भा.प्र.से.), मनपा आयुक्त श्री अकुनुरी नरेश (भा.प्र.से.), पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून चंद्रपूर पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा मांडला. तर पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी चंद्रपूर पोलिसांच्या तत्परतेचे आणि गुन्हे उकलण्याच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याबरोबरच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांनी उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानले. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. चोरीस गेलेला आणि हरवलेला मौल्यवान मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांनी चंद्रपूर पोलीस दलाप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई आणि नागरिकांच्या हक्काचा मुद्देमाल परत मिळवून देण्याची दुहेरी भूमिका बजावत चंद्रपूर पोलीस दलाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नागरिकांच्या विश्वासाला नवा आधार दिला आहे.




