वरोरा :- लोकमान्यक् महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शन ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त लोकमान्य महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाकडून विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त साहित्याचे ग्रंथ प्रदर्शन दिनांक 12/08/2026 रोजी आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकमान्य महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रवींद्र शेंडे यांनी केले.
या प्रदर्शनात एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती, कर्मचारी निवड आयोग तसेच विविध शासकीय व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ, प्रश्नसंच, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, गणित आदी विषयांवरील विविध पुस्तके विद्यार्थ्यांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली.
या ग्रंथ प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भ साहित्याची माहिती करून देणे आणि ग्रंथालयाचा शैक्षणिक उपयोग वाढविणे हा होता.यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध ग्रंथांचे अवलोकन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन विशेष उपयुक्त ठरले.
डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भारतातील ग्रंथालय चळवळीला दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आणि “ग्रंथालय हे ज्ञानाचे केंद्र आहे” या संकल्पनेचा विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात उपयोग करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.




