वणी (विशेष प्रतिनिधी) :-वणी तालुक्यातील शिरपूर उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात महावितरणच्या गलथान कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. २४ तासांत केवळ ३ ते ४ तास वीजपुरवठा होत असल्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पाऊल उचलले आहे. फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले असून, वीजपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रमुख मुद्दे :-कमाल भारनियमन, त्रस्त जनता, मंदर, चारगाव, वारगाव, शेलू, पुरड, पुनवट व परिसरातील इतर गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वीजपुरवठा अतिशय विस्कळीत झाला आहे.
विद्युत उपकरणांचे नुकसान :- दिवसातून शेकडो वेळा वीज ये-जा करत असल्याने नागरिकांचे टीव्ही, फ्रीज, पंखे, मोटार पंप आणि संगणक यांसारखे महागडे इलेक्ट्रिक साहित्य जळत आहेत.
विद्यार्थी व शेतकरी अडचणीत :- सततच्या वीजकपातीमुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि स्थानिक व्यावसायिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.
‘मनसे’चा अल्टीमेटम ‘स्थानिक पातळीवर वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाने या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘मनसे’च्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील.”फाल्गुन गोहोकार, मनसे.
सदर निवेदनाच्या प्रति माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी शिरपूर उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता तसेच वणी व शिरपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना पाठवण्यात आल्या आहेत. महावितरण आता या इशाऱ्याची कशी दखल घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




