वरोरा :- वरोरा तालुक्यातील वरोरा ते माढेळी हा मार्ग सध्या शाळकरी विद्यार्थी आणि प्रवाशांसाठी ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे. WCL च्या एकाना खुली कोळसा खदान (WCL Ekona OCP) मधून भरधाव वेगाने धावणारे डंपर आणि रस्त्याचे सुरू असलेले निकृष्ट व संथ बांधकाम यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. विशेष म्हणजे, सकाळी शाळेच्या आणि ऑफिसच्या वेळी डंपरची होणारी जड वाहतूक हजारो विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतत असून, प्रशासनाच्या या अनास्थेविरुद्ध परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.
या गंभीर समस्येबाबत एकोना ग्रामपंचायतीचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. गणेश दामोदरराव चवले यांनी उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्याकडे अत्यंत आक्रमक शब्दांत निवेदन सादर करत प्रशासनाला जाब विचारला आहे.
🙏 काय आहे नेमकी समस्या 🙏
वरोरा ते माढेळी १८ किलोमीटरच्या या मार्गावरून दररोज हजारो शाळकरी मुले-मुली स्कूल बस, ऑटो, बाईक आणि सायकलने शिक्षणासाठी वरोरागडे येतात. तसेच अनेक गावांमधील नागरिकांनाही याच मार्गावरून ये-जा करावी लागते. मात्र, एका बाजूला WCL एकीना खदानमधून सुसाट सुटणारे डंपर आणि दुसऱ्या बाजूला रस्त्याचे सुरू असलेले रखडलेले व धोकादायक बांधकाम यामुळे येथे नेहमीच जीवघेणी वाहतूक कोंडी होते. डंपरच्या धुळीमुळे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांची प्रचंड हेळसांड होत असून पालकांच्या मनात कायम भीतीचे वातावरण असते.
💥 अपघातांची मालिका सुरू, कुणाची प्रतीक्षा 💥
याआधीही या मार्गावर अनेक अपघात होऊन निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. मात्र तरीही प्रशासन आणि WCL व्यवस्थापन गाफील असल्याचे दिसून येत आहे. डंपरच्या लांबच लांब रांगांमुळे ट्रॅफिकमध्ये अडकून विद्यार्थ्यांना तास-नन्-तास ताटकळत राहावे लागते, परिणामी त्यांना शाळा व कॉलेजमध्ये पोहोचायला उशीर होतो व शिक्षणाचे नुकसान होते.
“विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या WCL च्या डंपरना शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी ठराविक बंदी घालावी किंवा त्यांच्या वाहतुकीसाठी एक निश्चित वेळ (टाइम टेबल) ठरवून द्यावी, जेणेकरून मार्ग सुरळीत होईल.” श्री. गणेश चवले , सरपंच (एकोना)
निवेदन देते वेळी माढेली ग्राम पंचायत सदस्य महेश देवतळे,दिलीप जीवतोडे वरोरा, प्रफुल आसुरकर जळका उपसरपंच,चंद्रकला वनशिंगे सरपंच चरुरखटी , चुडामन बल्की आमडी, तौर शेख, अरुण निखाडे उपस्थित होते. सरपंच गणेश चवले यांचा जळजळीत इशारा प्रशासनाने तातडीने या निवेदनाची दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आम्हाला मोठे तीव्र आंदोलन उभे करावे लागेल, असा सज्जड दमही यावेळी देण्यात आला आहे.




