Home जिल्हा रोटरी क्लब वरोराच्या ‘प्रकल्प शिक्षण संजीवनी’ अंतर्गत सर्वोदय विद्यालय सुमठानात विद्यार्थी गणवेश...

रोटरी क्लब वरोराच्या ‘प्रकल्प शिक्षण संजीवनी’ अंतर्गत सर्वोदय विद्यालय सुमठानात विद्यार्थी गणवेश वाटप संपन्न!

वरोरा :- रोटरी क्लब वरोराच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘प्रकल्प शिक्षण संजीवनी’ या स्तुत्य उपक्रमामार्फत नुकताच सर्वोदय विद्यालय, सुमठाना येथील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.



रोटरी क्लब वरोराच्या अध्यक्षपदाची धुरा नुकतीच अभिजीत मणियार यांनी स्वीकारली असून, पदभार स्वीकारताच त्यांनी समाजोपयोगी उपक्रमांची मालिका सुरू केली आहे. त्यांच्या या नवोपक्रमाशील आणि लोकोपयोगी भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुमठाना येथील सर्वोदय विद्यालयात पार पडलेल्या या गणवेश वाटप सोहळ्यात अध्यक्ष अभिजीत मणियार यांच्यासह क्लबचे अनेक प्रमुख पदाधिकारी व सदस्य आवर्जून उपस्थित होते.  रोटे. योगेश डोंगरवार , रोटे. सुनिल आयचीत आणि क्लबचे सचिव रोटे. अभिजित बोथले यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले.



“शिक्षणाविना प्रगती नाही आणि प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला शिक्षणाच्या समान सुविधा मिळायला हव्यात,” हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रोटरी क्लब वरोराच्या माध्यमातून भविष्यातही असे अनेक नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविले जातील, असा विश्वास यावेळी अध्यक्ष अभिजीत मणियार यांनी व्यक्त केला.



या उपक्रमामुळे सुमठाना येथील विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने रोटरी क्लब वरोराच्या या समाजोपयोगी कार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.