नागरी : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान, नागरी यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ‘जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय राम कृष्ण हरी’च्या अखंड नामघोषाने संपूर्ण नागरी गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे विश्वस्त श्री अनिलजी लुतळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो भाविक व देणगीदारांनी दिंड्यांच्या स्वागतासाठी उदार हस्ते देणगी दिली. तसेच मंदिराच्या वतीने सर्व वारकरी व भाविकांसाठी शेकडो किलो साबुदाणा खिचडी व उसळीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
यावर्षीच्या दिंडी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे हजारोंच्या संख्येने वारकऱ्यांची उपस्थिती आणि जवळपास ६५ ते ७० दिंड्यांचा सहभाग हे होते. यापैकी १२ दिंडी मंडळांना गुप्त देणगीदाराच्या सहकार्याने मंदिर देवस्थानतर्फे टाळ, मृदुंग व वीणा भेटस्वरूपात प्रदान करण्यात आली.
दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविक व वारकऱ्यांच्या सेवेसाठी नागरी ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गावामध्ये विविध ठिकाणी चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच नागरिकांनी आपल्या घरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढून परिसर सजवित दिंडीचे उत्साहात स्वागत केले.
यावेळी बोलताना मंदिराचे विश्वस्त श्री अनिल रावजी लुतळे यांनी सांगितले की, येत्या दोन ते तीन वर्षांत या दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व दिंडी मंडळांना टाळ, मृदुंग व वीणा देण्याचा मंदिर देवस्थानचा संकल्प आहे.
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या वारकरी सभागृह शेडचे उद्घाटन देखील संपन्न झाले. दिवसभर सुरू असलेल्या हरिनाम संकीर्तन, दिंडी, टाळ-मृदुंगाच्या गजर आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषामुळे संपूर्ण नागरी गाव भक्तिमय वातावरणात रंगून गेले. या भक्तिमय सोहळ्यामुळे आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा झाला.




