चंद्रपूर :- भद्रावती तालुक्यातील मौजा घोरपेठ सायवन येथील पुनर्वसित कुटुंबांना रेल्वे प्रशासनाकडून बेघर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून कायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या या गरीब कुटुंबांना कुठलीही पूर्वसूचना न देता, रेल्वे प्रशासन सक्तीने घर रिकामे करण्यासाठी दबाव टाकत असल्याने हे रहिवासी आता आक्रमक झाले आहेत.
मौजा घोरपेट सायवन हे गाव रेल्वे प्रकल्पामुळे बाधित झाले होते. त्यानंतर प्रशासनाने या गावाची पुनर्वसणाची प्रक्रिया पूर्ण केली. पुनर्वसनानंतर आम्हाला मौजा घोरपेट येथे रेल्वेच्या जागेला लागून राहण्यासाठी जागा देण्यात आली. त्यानुसार गेल्या 30 ते 40 वर्षांपासून आम्ही पक्के घर बांधून येथे वास्तव्य करत आहोत. या जागेचा आम्ही नियमितपणे करही भरत आहोत. मात्र, आता रेल्वे प्रशासन अचानक कोणतीही ठोस नोटीस न देता आम्हाला जागा रिकामी करण्यासाठी दबाव टाकत आहे.
💠 गरीब कुटुंबांवर अन्याय 💠
या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या भद्रावती तालुका अध्यक्ष (ग्रामीण) सौ. रक्षिता निरंजने यांनी पुढाकार घेऊन ज्योती प्रफुल शेडमाके (वय 38), वंदना दिलीप धुर्वे (वय 35 ), रामकला भारत पटेल (वय 50) आणि हे कुटुंब भरडले जात आहेत. हे सर्व कुटुंब अत्यंत गरीब असून, रेल्वेच्या जागेत किंवा पुनर्वसनाच्या ठिकाणी नियमानुसार मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही आमची घरे रिकामी करणार नाही, अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.
💠 प्रशासनाला इशारा 💠
“आम्हाला पुनर्वसनाचे नियम आणि कायदेशीर मोबदला मिळाल्याशिवाय आम्ही आमची घरे सोडणार नाही. जर रेल्वे प्रशासनाने बळजबरीने आमची घरे पाडली किंवा कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली, तर त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी असतील,” असा सज्जड इशारा रहिवाशांनी दिला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून, गरीब कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही या कुटुंबांनी दिला आहे.




