चंद्रपूर :- जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य राहावे, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना कायमचा लगाम बसावा, या उद्देशाने चंद्रपूर पोलीस दलाने एक अत्यंत आक्रमक आणि धडक मोहीम राबवली आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चक्क १९८ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ‘विशेष परेड’ घेत त्यांना कडक भाषेत समज दिली आहे.
💥 काय आहे नेमकी कारवाई 💥
दरवडा, जबरी चोरी आणि घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आणि सध्या जामिनावर मुक्त फिरणाऱ्या रेकॉर्डवरील १९८ गुन्हेगारांना पोलिसांनी एकाच छताखाली बोलावले. त्यांची झाडाझडती घेत त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची सखोल चौकशी करण्यात आली.
💥 गुन्हेगारांना पोलिसांचा सज्जड इशारा 💥
या विशेष परेड दरम्यान, पोलिसांनी सर्व गुन्हेगारांना ठणकावून सांगितले की, न्यायालयाने जामीन देताना घातलेल्या सर्व अटी आणि शर्तींचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या गुन्हेगाराने अटींचा भंग केला किंवा पुन्हा गुन्हेगारीकडे पाऊल टाकले, तर त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस प्रशासन तत्काळ न्यायालयात धाव घेईल, असा थेट आणि कडक इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.
💥 प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा 💥
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या जामीनप्राप्त आरोपींवर यापूर्वी कोणतीही प्रतिबंधात्मक (Preventive Action) कायदेशीर कारवाई झाली नव्हती, अशांवर पोलिसांनी आता प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये केवळ वचक निर्माण झाला नसून, त्यांच्या गुन्हेगारी मानसिकतेलाही मोठा चाप बसणार आहे.
💥’२४ तास’ गुन्हेगारांवर करडी नजर 💥
या धडक मोहिमेनंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना विशेष निर्देश देण्यात आले आहेत. आपल्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या दैनंदिन हालचालींवर २४ तास करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हेगार पुन्हा सक्रिय होणार नाहीत किंवा टोळ्या निर्माण करणार नाहीत, याची संपूर्ण दक्षता घेण्याची जबाबदारी आता स्थानिक पोलिसांवर आहे.
💥नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड नाही 💥
“चंद्रपूर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही,” असे स्पष्ट करत पोलिसांनी जनतेला दिलासा दिला आहे. भविष्यात कायदा मोडणाऱ्यांवर अशीच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा ठाम विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.




